नाशसंरक्षणाचे गुण.
कित्ता.
१ अकर्म हेंच फजितीचें कारण आहे. तें अगोदर समजोन आपली खोड आपण टाकावी.
१ आपल्या चुकीचा अन्याय असेल तो *तात्काळ पदरीं घेऊन एकांतीं आपले हातीं कानास खडा लावून घ्यावा.
१ गमाविल्याचें दु:ख किती आहे तें अगोदर समजावें. तरीच तो दुसरी वस्त जतन करील.
१ कांहीं एक अकर्म झालें तरी त्याचा पश्चात्ताप चित्तास व्हावा, तरी तो मुक्त होईल.
१ पुन्हा अकर्म घडूं नये असें नित्य वर्तावें.
१ अहंकाराच्या ओढी अनिवार आहेत, यास्तव त्यांचें दमन करावें. त्यांचे स्वाधीन होऊं नये.
१ मन वश करावें, धर्माकडे योजावें.
१ सरळ, चित्तप्रशस्त असावें. कुचर नसावें.
१ नाशाचा स्वभाव ओळखून त्याची मोड आपलें चित्तांतून उपटोन टाकावी. हेंहि बुध्दीचें सामर्थ्य असावें.
१ आपलें मन आपणास गुरू करून गेलें वय, गेलें वित्त व गेलीं विद्या हीं तीन सार्थकीं योजावीं. याचें नांव शहाणपण.
१०
सदर्हू गुण लिहिले आहेत. या प्रकारें फिरोन आपला आपण सावध होऊन वर्तला तरी गेली गोष्ट संभाळोन पुन्हा त्याजवर ईश्वर कृपा करील. श्रीकृष्णार्पणमस्तु.
शिक्षात्रय मिदं जानंञ् लाभपालननाशनं ॥
शासनं वर्तनं येन कुरुते स जगद्वशी ॥१॥ कलम.