मनुष्याचा उपयोग राज्यांत व्हावा एतन्निमित्त शिक्षेचा सारांश लिहिला आहे. हा सर्व व्यवहारीं उपमेस घ्यावा. सर्वांस शिक्षा एकरूप असावी. शंभर अश्व एक शिक्षेनें शिकवून
तयार केले तर त्यांचे स्वभाव, कार्य एकरूप होत असतें. तसें जें जें कार्य करणें त्या व्यवहाराचे मनुष्यास एक सारिखे शिक्षेनें शंभर माणूस तयार केले तरी तितके माणूस एक
कार्यास उपयोगी पडेल. त्यास म्हणावें शंभर शहाणें, अक्कल एक. नाही तर आपलाले बुध्दीनें शहाणें झाल्यास एकाचें शहाणपण एकास मिळणार नाहीं. तीं माणसें व्यर्थ श्रम
करून त्यांच्यानें कांहीं संरक्षण होणार नाहीं. यास्तव राजानें जपोन शिक्षायुक्त वर्तविल्यास
तोच विश्वकुटुंबी ह्मणावा. न केल्यास राजाचा व प्रजेचाहि नाश आहे. यास्तव जागा जागा पध्दती घालोन काम चालवावें.
९ उदमांत शहाणें असावें, त्याचे गुण.
१ नफा उदमांत गुंतवूं नये.
१ फार नफा घेऊं नये.
१ मूर्खाशीं धंदा करूं नये.
१ आहारीं देणें घेणें ठेवावें.
१ नोनें सत्य बोलावें.
१ शेवटीं सावकार व कुळ मोकळें होय असें मुळीं जपावें.
१ उधार थकूं देऊं नये. मुदतीस वसूल घेत जावा.
१ भोळें कोणाचें घेऊं नये.
१ भांडवल व पत बहुत सावधपणें जतन करावीं.
९
४ वतनसंबंधें आचरण, त्याचें गुण.
१ भोगवटा चालवावा.
१ वाद्याचें खोटें ठिकाणीं लावावें.
१ दायादभाग वाटून खावा.
१ वडीलपणाचें स्वामित्व कांहीं समजोन राखावें.
४
४ समाधानवृत्ति असावी. त्याचे गुण
१ लाभ होईल तो ईश्वरास निवेदन करावा. अभिमान करूं नये.
१ अभिमानी पांडवांचा वनवास स्मरावा. तेथेंहि धर्म सोडिला नाहीं हे समजावें.
१ गमाविल्याचा शोक करूं नये.
१ करावयाचें तें आधीं बोलूं नये.
४