जैन, लिंगायत व मानभाव ह्यांच्यांत कमजास्त प्रमाणानें जातिभेद व्यवहारांत मानीत नाहीत. संताळ्यांत विठोबाच्या मंदिरांत तेवढा जातिभेद मानीत नाहींत, व्यवहारांत मानतात. ह्या भक्तिपंथाची स्थापना महाराष्ट्रांत तेराव्या शतकांत झाली. संताळ्याची ही स्थापना झाल्यावर कांहीं कालानें देवगिरी येथील मराठ्यांचें राज्य नष्ट झालें व यवनांची सत्ता महाराष्ट्रांत तीनशे वर्षे, म्हणजे शके १२४० त देवगिरी घेतल्यापासून शके १५४० अहमदनगरची मनसबगिरी शहाजीला मिळेतोंपर्यंत, बहुतेक अव्याहत चालली. ह्या तीन शतकांत संताळ्याचेंच प्राबल्य महाराष्ट्रांत फार होतें. संत म्हटला म्हणजे अत्यंत पंगुपणाचा केवळ मूर्तिमंत पुतळाच होय. संतला खाणें नको, पिणें नको, वस्त्र नको, प्रावरण नको, कांही नको, एक विठोबा मिळाला म्हणजे सर्व कांही मिळालें. ऐहिक सुखदुःखें, ऐहिक उपभोग, ऐहिक व्यवहार, त्याच्यांत मन घालणें संताचें काम नव्हें. इहलोक हा संताचा नव्हेच. राजा कोणी असो, सारा कोणी घेवो, संताला त्याचें कांही नाहीं. असल्या ह्या संतमंडळींच्या हाती विचाराची दिशा जाऊन, महाराष्ट्र तीन शतकें पंगू बनून राहिलें. सनातन धर्माला त्रासून महाराष्ट्रांतील लोकांनीं जीं धर्मक्रांती केली तिचें स्वरूप हें असें होतें. ह्या धर्मक्रांतीनें धर्मोन्नती, राष्ट्रोन्नती होण्याचें एकीकडेच राहून उलटी धर्मावनती, राष्ट्रावनती मात्र झाली. कालांतरानें यवनाच्या अमलाखालीं पायमल्ली झालेली पाहून, मराठ्यांचे डोळे उघडले, ह्या पंगू संताळ्यांचा त्यांना वीट आला, आणि सनातन धर्माकडे, गो-ब्राह्मण प्रतिपालनाकडे व चातुर्वण्याकडे त्यांनीं पुन्हा धाव घेतली. ह्या उपरतीच्या वेळी, रामदासस्वामी, रंगनाथस्वामी, मोरया देव वगैरे सनातनधर्माभिमानी विचारी साधू पुरुष झाले व ते महाराष्ट्रास महाराष्ट्रधर्माचा उपदेश करते झाले. ह्या सनातन धर्माभिमानी साधुपुरुषांच्या वेळीं संताळे आपला संथ मार्ग आक्रमीतच होते. परंतु इहलोकीचे अर्थ साधण्यास संताळ्याचा उपयोग कांही नाहीं हे तुकाराम पूर्णपणें जाणून होता. शिवाजी तुकारामाकडे उपदेश घेण्याकरितां गेला असतां त्या प्रामाणिक साधूनें आपल्यासारख्या पंगू माणसाकडे न येतां समर्थांच्याकडे जाण्यास शिवाजीस उपदेश केला. संताळ्यांतील पंगुत्वाला उपरोधूनच समर्थ हें नाव अस्तित्वांत आलें, हे लक्षांत घेतलें असतां, तुकारामाच्या उपदेशाचें महत्त्व व त्यानें स्वतः स्वीकारलेल्या पंथाचे लघुत्व कळून येईल. संताळ्याच्या उपदेशानें महाराष्ट्रांत नवीन जोम आला म्हणून न्यायमूर्ती रानडे म्हणतात तो खरा प्रकार नसून, समर्थांनीं काढिलेल्या नवीन रामदासी पंथाच्या उपदेशानें तो चमत्कार घडून आलेला आहे. निवृत्तीकडे ज्यांचे डोळे लागले त्या संतांच्या हातून हें प्रवृत्तिपर कृत्य व्हावें कसे? “समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळीं कोण आहे!” असली धमकी देणा-या समर्थांच्याच महोपदेशाचा तो परिणाम होय.
समर्थांनी नवीन बनविलेल्या महाराष्ट्रधर्म या शब्दाचा नीट अर्थ न कळल्यामुळें, न्यायमूर्तीनीं रामदासांच्या महाराष्ट्रधर्माची व संतांच्या भक्तिमार्गाची तद्रपता कल्पिली व एकाच्या गुणाचा आरोप दुस-यावर केला. ह्या अवस्त्वारोपामुळें न्यायमूर्तीची कार्यपरंपरा चुकली व असमर्थ कारणापासून समर्थ कार्याची उत्पत्ति झाली असें चमत्कारिक विधान त्यांच्या हातून पडलें गेलें. श्रीमदाचार्यप्रणीत सनातनधर्माच्या कठोर आचाराला कंटाळून त्याच्या विरुद्ध झालेली जी धर्मक्रांति ती संताळ्याचा भक्तिमार्ग होय. ह्या पंगू भक्तिमार्गाच्या किंचित् विरुद्ध झालेली जी धर्मशुद्धि ती समर्थांच्या प्रवृत्तिपर महाराष्ट्र धर्माच्या साहाय्यानें पुनरुज्जीवित झालेला सनातनधर्म होय. (१) श्रीमदाचार्यप्रणीत सनातनधर्मं (२) संतप्रणीत भक्तिमार्ग व (३) श्रीसमर्थप्रणीत महाराष्ट्रधर्मोज्जीवित सनातनधर्म, अशी खरी परंपरा आहे. प्रवृत्तिपर धर्माला सोडून मराठ्यांनीं निवृत्तिपर भक्तिमार्गाचा अवलंब जेव्हां केला तेव्हां त्यांची राज्यावनति झाली; व निवृत्तिपर भक्तिमार्ग किंचित् सोडून प्रवृत्तिपर सनातन धर्माला पुन्हां येऊन मिळण्याचा प्रयत्न जेव्हां त्यांनी केला तेव्हां त्यांची राज्योन्नति झाली; असा ह्या परंपरेचा अर्थ आहे.