बाकी ज्या मल्हार रामरावाच्या आधारानें ग्रांट डफनें आपल्या बखरीची रचना केली त्या मल्हाररावाच्या बखरींत ह्या महाशब्दाचा उल्लेख झालेला आहे. हा महाशब्द न्यायमूर्ती रानडे व प्रो. राजारामशास्त्री भागवत ह्यांच्या लेखांनीं आधुनिक वाचकांस प्रथम माहीत झाला. इतकेंच कीं ह्या महाशब्दाचा खरा अर्थ ह्या दोघांहि इतिहासज्ञांच्या ध्यानांत जसा यावा तसा आला नाहीं. ह्याचें कारण असें झालें कीं ह्या दोघांहि शोधकांना हा शब्द प्रथम समर्थांच्या दासबोधांत प्रमुखत्वानें उच्चारलेला सांपडला व तेवढ्यावरच समाधान मानून ह्या शब्दाचा अर्थ करण्यास ते लागले. शिवाय ह्या शब्दाचा अर्थ करतांना, ह्या दोघांहि शोधकांच्या धर्मसमजुतीची पूर्वग्रहात्मक छटा ह्या शब्दाच्या अर्थावर आपला ठसा प्राबल्येंकरून उठविती झाली. सोळाव्या शतकांत पश्चिम युरोपांत क्याथोलिक धर्माविरुद्ध जी क्रांति झाली तिचे वृत्तांत वाचून ह्या शोधकांची मनें तल्लीन झालेलीं आहेत. व उत्तर हिंदुस्थानांत व महाराष्ट्रांत दहाव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत जीं भागवतधर्माची किंवा भक्तिमार्गाची लाट उसळली ती सनातन धर्माच्या विरुद्ध क्रांतीच होती असें ह्या शोधकांचें मत आहे. हें मत खरें आहे किंवा खोटें आहे, हें पारखण्याचें हें स्थळ नव्हें. येथें इतकेंच सांगावयाचें आहे कीं, युरोपांतील प्रोटेस्टंट धर्मांत व महाराष्ट्रांतील भक्तिमार्गांत कांहीं, कदाचित् बरेंच, साम्य आहे असें ह्या शोधकांस वाटलें. क्याथोलिक धर्माविरुद्ध क्रांती करूं भासणा-या धर्मास भागवत धर्म, भक्तिमार्ग, उपासना मार्ग, वगैरे एकाहून जास्त संज्ञा असतां, महाराष्ट्रधर्म हा नवीन शब्द भेटतांच तोहि ह्या क्रांतिरूप धर्मकल्पनेचा वाचक असावा, अशी ह्या शोधकांनी आपली समजूत करून घेतली. महाराष्ट्रधर्म ह्या शब्दाचा वास्तविक अर्थ बखरकरांच्या व रामदासाच्या म्हणण्याप्रमाणें काय आहे तें पाहिलें असतां व ऐतिहासिक परंपरेने ह्या शब्दाचा अर्थ काय होतो हें लक्षात घेतले असतां, न्यायमूर्ती रानडे व प्रो. भागवत ह्यांनी केलेला ह्या शब्दाचा अर्थ बरोबर नाहीं, हें स्पष्ट होईल.
धर्म ह्या शब्दाचे अर्थ मराठी भाषेंत चार आहेतः- (१) धर्म म्हणजे गुण, (२) धर्म म्हणजे कर्तव्य, (३) धर्म म्हणजे दान, व (४) धर्म म्हणजे आत्यंतिक दुःखध्वंसाचा मार्ग पैकी चवथा अर्थ महाराष्ट्रधर्म. ह्या शब्दांतील धर्म ह्या पदाचा करून महाराष्ट्रधर्म म्हणजे सनातन धर्माच्या विरुद्ध असा एक धर्मपंथ असावा अशी ह्या दोघां इतिहासज्ञांनी आपली समजूत करून घेतली आहे. परंतु रामदासाची व बखरकरांची तशी समजूत नव्हती. रामदासानें क्षात्रधर्म, सेवाधर्म, राजधर्म, स्त्री-धर्म, पुरुषधर्म, वर्गैरे जे शब्द योजिले आहेत त्यांत धर्म ह्या शब्दाचा अर्थ कर्तव्य असा स्पष्ट आहे. तोच प्रकार महाराष्ट्रधर्म ह्या शब्दाचा आहे. महाराष्ट्रधर्म म्हणजे सर्व महाराष्ट्राचा, सर्व मराठा समाजाचें कर्तव्य असा रामदासाचा आशय आहे. ‘मराठा तेवढा मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा,’ ह्या वाक्यांत रामदासानें आपला आशय स्पष्ट करून दाखविला आहे. भारतवर्षांत मराठा म्हणून जेवढा असेल-मग तो महाराष्ट्रांत असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असो, शिवाजीच्या पदरीं असो, किंवा विजापूर, भागानगर, अमदाबाद, किंवा दिल्ली येथील यवनांच्या सेवेंत असो,- तेवढा सर्व एक करून महाराष्ट्रधर्माची व्याप्ती सर्व मराठमंडळांत करावी, असा रामदासाचा उपदेश होता. महाराष्ट्रधर्मात मराठा जेवढा असेल तेवढ्याचीच व्याप्ती करावी, असा रामदासाचा कटाक्ष होता. महाराष्ट्रधर्म हा राजकीय उन्नतीचा मार्ग नसून धर्मोन्नतीचा जर पंथ असता, तर त्यांत भारतवर्षांतील इतर हिंदूंचाहि समावेश करावा असा रामदासांनी स्पष्टोल्लेख केला असता. संतमंडळींचा जो भक्तिमार्ग, त्यांत हिंदु, मुसलमान, ब्राह्मण, अतिशूद्र, वाटेल तो खपत असे. परंतु मराठ्यांचा जो महाराष्ट्रधर्म त्यांत अस्सल मराठा जो असेल तोच सामावला जाई. धर्म, धर्मस्थापना, हिंदुधर्म हे शब्द जेथें जेथे दासबोधांत योजिले आहेत, तेथें तेथें धर्म हा शब्द दुःखध्वंसाचा मार्ग ह्या अर्थीच योजिलेला आहे. परंतु सेवाधर्म, राजधर्म, स्त्रीधर्म, महाराष्ट्रधर्म हे शब्द जेथें जेथें दासबोधांत योजिले आहेत, तेथें तेथें धर्म ह्या शब्दाचा अर्थ कर्तव्य असा बिनचूक आहे.