घटकत्रयीचा संघात कसा झाला, हें त्यांना कळलें नाही व अर्थात् महाराष्ट्राच्या इतिहासाच्या आत्म्याची ओळख त्या्ना बिलकुल झाली नाहीं. घटकत्रयीचा पत्ता नीट न लागल्याकारणानें आत्मिक इतिहासाची ओळख ह्या इतिहासकारांना झाली नाहीं एवढेंच नव्हे, तर अर्थात् तत्कालीन लहानमोठ्या व्यक्तींच्या चरित्रांतील अनेक गोष्टींचे अज्ञान त्यांचें ठायीं कायम राहिलें. राष्ट्रांतील मोठमोठ्या व्यक्तींचीं चरित्रें म्हणजेच राष्ट्रांचा इतिहास होतो, असें एक विधान आहे व तें बव्हंशीं खरें आहे. व्यक्ती ह्या समाजाच्या घटक होत व मोठ्या व्यक्ती समाजाचे मोठे घटक होत. अर्थात्, मोठ्या व्यक्तींचीं चरित्रें काहीं एका अंशानें समाजाचा इतिहास होत. लहान व्यक्तींचीं चरित्रें व मोठ्या व्यतींचीं चरित्रे मिळून समाजाचा संपूर्ण इतिहास होतो. समाजांत मोठ्या व्यक्ती केव्हांही थोड्या असल्यामुळें मोठ्या व्यक्तींच्या इतिहासाला लहान व्यक्तींच्या म्हणजे बहुजनसमाजाच्या इतिहासाचा जोड द्यावा लागतो. केवळ मोठमोठ्या व्यक्तींच्याच चरित्रानें समाजाचा इतिहास संपूर्ण होत नाहीं, हें पक्कें समजून पाश्चात्य इतिहासकार बहुजनसमाजस्थितिसंबंधी देववेल तितकी सशास्त्र व सप्रमाण माहिती आपापल्या इतिहासांतून देत असतात. मराठी बखरकारांना व ग्रांट डफला मोठमोठ्या व्यक्तींच्या चरित्रांतील बहुतेक प्रत्येक प्रसंगाची माहिती अपुर्ती, त्रोटक, तुटक व अव्यवस्थित देऊन समाधान मानणें जेथें भाग पडलें, तेथें त्यांच्या ग्रंथांतून तत्कालीन बहुजनसमाजाच्या स्थितीचें वर्णन वाचण्याची अपेक्षा करणें म्हणजे अयोग्य स्थलीं अपेक्षित वस्तूचा शोध करण्याचा व्यर्थ परिश्रम करण्यासारखेंच आहे. बखरकारांच्या व ग्रांट डफच्या ग्रंथांची यद्यपि अशी स्थिति आहे, तत्रापि इतिहासकाराच्या उच्च कर्तव्याचें स्मरण अधूनमधून त्यांना झालेलें दृष्टोत्पत्तीस येतें. अशीं स्थलें फार नाहींत, थोडींच आहेत, परंतु आहेत. ह्या स्थलांचा प्रस्तुत शंकास्थानांत विचार कर्तव्य आहे. पहिल्या तीन शंकास्थानांत मजकुराच्या अनुक्रमासंबंधीं व तपशिलासंबंधीं, म्हणजे काल, स्थल व व्यक्ती ह्यांच्या संबंधीं, ह्या लेखकांनीं काय काय गफलती व दोष केले आहेत ते दाखवून कैफियत देण्याच्या व रचण्याच्या कामीं हे ग्रंथकार किती पंगू आहेत ह्या बाबीचा खल झाला. आतां ह्या व पुढील शंकास्थानांत ऐतिहासिक सामान्य सिद्धांत स्पष्टपणें सांगण्याच्या व मोठमोठ्या व्यक्तींचें स्वभाववर्णन करण्याच्या कामीं ह्या ग्रथंकारांची ऐपत कितपत आहे, त्याची परीक्षा करतो.
सामान्य सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें, मल्हार रामराव चिटणीसानें व ग्रांट डफनें स्वतंत्र असा फारच थोड्या स्थलीं केला आहे, व इतर बखरकारांनीं मुळीच केला नाहीं. शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें व मल्हार रामरावानें सतराव्या शतकाच्या पहिल्या व दुस-या पादांत हिंदुधर्माच्या दैन्यावस्थेचा उल्लेख कोठें कोठें प्रसंगोपात्त केला आहे. ह्या पलीकडे समाजाला सजीव करणा-या महाकारणांचा उल्लेख ह्या बखरनविसांनी केला नाहीं. ग्रांट डफला तर इतक्या खोल पाण्यांत शिरण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकताच भासली नाहीं. सतराव्या शतकांत महाराष्ट्रांतील मोठमोठ्या व्यक्तींना ज्या महाविचारानें हलवून सोडिलें, त्यांचें सविस्तर किंवा संक्षिप्त प्रतिपादन बखरनविसांनीं केलें नाहीं हें खरें आहे; परंतु त्या महाविचाराचा द्योतक जो शब्द त्याचा उच्चार वारंवार त्यांनीं केलेला आहे. ग्रांट डफला ह्या महाशब्दाची ओळखहि नव्हती. ज्याला तत्कालीन प्रसंगांची व्यवस्थित, मुद्देसूद व सविस्तर हकीकत देण्याची अडचण पडली, त्याला तत्कालीन महाविचार व तद्वाचक शब्द धुंडाळीत बसण्याला अवकाश नव्हता हें रास्तच झालें.