सभासदांची बखर केवळ स्मृतीवर हवाला ठेवून दूर प्रातीं लिहिली असल्यामुळें तींत कालानुक्रमाची व्यवस्था राहिली नाहीं. परंतु लेखकानें शिवाजीची कांही कारकीर्द स्वतः अनुभविली असल्यामुळें ज्या प्रसंगाची हकीकत त्यानें दिलीं आहे तें प्रसंग खरोखरीच घडले, एवढें कबूल करावें लागतें. हकीकतींतील तपशील तसा दिला आहे तसाच असेल किंवा कसें, ह्याबद्दल मात्र संशय येतो. मल्हार रामराव चिटणीसाच्या बखरींत जुन्या टिपणांचा उपयोग केला आहे, कोठें कोठें मित्याहि दिल्या आहेत व एक दोन स्थळीं जुन्या ग्रंथांतील उतारे दिले आहेत. हाच प्रकार शिवदिग्विजयांतहि विशेष झालेला दिसून येतो. त्यावरून शिवाजीच्या चरित्रांतील कित्येक प्रसंगांसंबंधानें असे विधान करता येतें कीं, ह्या दोन बखरींतील कांही वाक्यें सभासदी बखरींहून जुनीं आहेत. बाकी शिवाजीच्या चरित्रांतील पुष्कळ प्रसंगांचा कालानुक्रम व हकीकतींचा तपशील सभासदी बखरीप्रमाणें ह्याहि दोन बखरींत संशययुक्त आहे. चित्रगुप्ताच्या बखरीसंबंधीं माझे म्हणणें काय आहे तें मीं पूर्वी सांगितलेंच आहे. बाकी राहिलेल्या तीन बखरी अधूनमधून बघण्यासारख्या आहेत. अलीकडे भारतवर्षांत शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर छापिली आहे, तिच्यासंबंधीं विशेष कांहीं सांगण्यासारखें आहे असें नाहीं. येथें आक्वर्थ व शाळिग्राम यांनीं छापिलेल्या पोवाड्यांसंबंधी व रा. मुजुमदार यानीं छापिलेल्या प्रभुरत्नमालेसंबंधीं दोन शब्द लिहिणें प्रासंगिक दिसतें. आक्वर्थ व शाळिग्राम यांनीं छापिलेल्या पोवाड्यांपैकीं तीन पोवाडे शिवरजीसंबंधानें आहेत. पैकीं अफजलखानाचा व बाजी पासलकराचा पोवाडा अस्सल आहे. अर्थात् ते ते प्रसंग झाल्यावर लागलेच लिहिलेले आहेत. परंतु तानाजी मालुस-याच्या पोवाड्यांतील काहीं भाग तो जगप्रसिद्धच प्रसंग झाल्यावर लगेच लिहिला नाहीं, हें खात्रीनें सांगता येतें. कां की, सिंहगड किल्ला औरंगझेबाच्या हातून शिवाजीनें घेतला असें असून तो विजापूरकरांच्या हातून शिवाजीनें घेतला असें दाखविण्याचा शाईराचा रोख दिसतो. पहिल्या कडव्यांत मोगल हा शब्द योजून पुढें त्याच कडव्यांत विजापूरचें नांव कवीनें घेतलें आहे. त्यावरून असें दिसते कीं, ह्या कडव्यांत तानाजी मालुस-याच्या एका जुन्या पोवाड्यांतील कांहीं ओळींचा कोण्या नवीन तत्कालीन इतिहास माहीत नसणा-या कवीनें आपल्या कवितेशी जोड बनविला आहे. तसेंच ह्या पोवाड्याच्या २६ व्या कडव्यांत 'ग्याट' हा शब्द योजिला आहे, त्यावरून तर ह्या कडव्यांतील ही ओळ क्षेपक असावी, असें निःसंशय ठरतें शिवाय, ह्या पोवाड्याच्या शेवटल्या कडव्यांत “हजार रुपयांचा तोडा । हातामधीं घातला । त्यारे तुळशीदास शाहीराच्या” अशी तुळशीदास शाहीराहून निराळ्या अशा तिस-याच कवीची उक्ति आहे. सारांश तुळदास कवीच्या मूळ पोवाड्यांत नवीन भर घालून हा पोवाडा तयार केलेला आहे. पोवाड्यांना टीपा दिल्या आहेत. त्याहि पुष्कळ ठिकाणीं चुकलेल्या आहेत उदाहरणार्थ, ‘साखरे हे गांव कुलाबा जिल्ह्यांत आहे’ म्हणून एक टीप ३३ व्या पृष्ठावर दिली आहे. साखरें हें येल्याच्या पेठेच्या जवळ राजगडासमोर मावळांत आहे, कोकणांत नाहीं. तात्पर्य, सदर पोवाडे पारखून व तपासून काळजीनें छापिलेले नाहींत. प्रभुत्नमालेंतील परिशिष्टांखेरीज बाकीचा मुख्य भाग पुनरुक्त, अतिशयोक्त, अप्रमाण व बालिश असा आहे. परिशिष्टांत यद्यपि अस्सल असे लेख छापिले आहेत तरी त्यांत अशुद्ध असा भाग बहुत आहे. उदाहरणार्थ, चवथ्या परिशिष्टांतील “सु सितैन सबैन अलफ” ही अक्षरें चुकलेलीं आहेत. पांचव्या परिशिष्टांत बहुल चतुर्दशीला २१ चंद्र दिला आहे तो अर्थात चुकला आहे. कारण, वद्य १४ ला २१ वा चंद्र कधींच नसतो. तसेंच ह्याच परिशिष्टांत राज्याभिषेक शक २९ ला संवत्सर सर्वजित् सांगितला आहे, व राजा शाहू दिला आहे! तात्पर्य, प्रभुरत्नमाला हें पुस्तक बहुत स्थळीं अप्रमाण आहे. पोवाडे व प्रभुरत्नमाला ह्या पुस्तकांची परीक्षा ह्या स्थळी अशाकरितां केली कीं, दोन्ही पुस्तकांतील कांहीं भाग शिवाजीच्या कारकीर्दीतील प्रसंगांना अनुलक्षून आहेत.
ह्या तीन शंकास्थानांत बखरींतील काहीं भागांची परीक्षा करून दाखविली आहे, त्यावरून बखरींतील मजकुराच्या अनुक्रमाच्या व तपशिलाच्या विश्वसनीयतेची इयत्ता साहजिकच कळून येईल. सर्व बखरींतील सर्व मजकुराची परीक्षा करण्याचें विशेष प्रयोजन नसल्यामुळें व प्रकृत स्थळ त्या कामाला अपूर्ते असल्यामुळें ह्यासंबंधीं जास्त विस्तार येथें करीत नाहीं.