परंतु शके १५७१ त प्रतापगड मुळी अस्तित्वांतच नव्हता हें लक्षात आणिलें असतां बखरकार ह्या ठिकाणी निव्वळ बरळत आहेत असें म्हणावें लागतें. तात्पर्य, बखरकारांच्या मजकुरांतील तपशील अस्सल पत्रांच्या किंवा जुन्या ग्रंथांतील उता-यांच्या रूपानें जेवढा दिला असेल तेवढाच खरा मानावा. बाकीचा तपशील खरा कां मानावा दाखवून देणें कठीण आहे.
(२) परीक्षणाकरितां घेतलेला दुसरा ऐतिहासिक प्रसंग चंद्रराव मो-याच्या पारिपत्यासंबंधीचा आहे. (अ) सभासदी बखरींत ह्यासंबंधीं मजकूर येणेंप्रमाणे आहे. (१) रघुनाथ बल्लाळ सबनीस याला चंद्ररावाकडे हेजिबीस पाठविलें. (२) त्यानें चंद्रराव व सूर्याजीराव मोरे यांस स्वतः मारिले (३) संभाजी कावजीनें चंद्ररावाचा भाऊ हणमंतराव मोरे यांस मारिलें.
(ब) सप्तप्रकरणात्मक चरित्रांत ह्यासंबंधीं मजकूर असा आहेः- (१) राघो बल्लाळ सबनीस यास चंद्ररावाकडे हेजिबीस पाठविलें. (२) त्याने चंद्रराव व त्याचा भाऊ सूर्यराव यांस मारिलें. (३) संभाजी कावजीनें मोरे यांचे कारभारी हनुमंतराव यास मारिलें. (४) चंद्ररावाचे लोक बाजीराव व कृष्णराव यांसा पुणें येथें निमजग्यांत नेऊन मारिलें. (५) चंद्ररावचे कबिले सोडून दिले.
(क) शिवदिग्विजयांत येणेंप्रमाणें मजकूर आहेः- (१) रघुनाथपंत चंद्ररावाचा भाऊ व त्याचा कारभारी जो हणमंतराव त्याजकडे हेजिबीस गेला (२) रघुनाथपंतानें हणमंतरावास मारिलें. (३) रघुनाथपंत शिवाजीस भेटण्यास पुरंधरास आला. (४) मग शिवाजीनें व रघुनाथपंतानें चंद्ररावावर स्वारी करून, लढाई देऊन मारिलें. (५) बाजीराव मोरे व कृष्णराव मोरे, चंद्ररावाचे लेक, यांस पुण्यात निमजग्यांत आणून ठेविलें.
(ड) ग्रांट डफचा मजकूर असा आहेः- (१) राघो बल्लाळ व संभाजी कावजी यांना चंद्ररावाकडे हेजिबीस पाठविलें. (२) राघो बल्लाळानें चंद्ररावास व संभाजी कावजीनें त्याच्या भावाला मारिलें. (३) जावळीच्या लढाईंत हिंमतराव मारला गेला व चंद्ररावाचे पुत्र कैद केले गेले.
(ई) चित्रगुप्ती बखरींत मजकूर येणेप्रमाणें आहेः-(१) रघुनाथराव सबनिसाला चंद्ररावाकडे हेजिबीस पाठविलें. (२) त्याने चंद्रराव व त्याचा भाऊ सुरेराव यांस ठार मारिलें. (३) चंद्ररावाचा भाऊ हणमंतराव चतुर्वेटांत होता त्याला संभाजीने शरीरसंबंधाचें मिष करून मारिलें.
(फ) प्रो. फारेस्ट यांनीं छापिलेल्या रायरी येथील बखरींत मजकूर असा आहेः- (१) चंद्रराव मो-याचा दिवाण हणमंतराव मोरे महाबळेश्वरीं होता. (२) त्याजकडे शरीरसंबंधाचें बोलणे करण्याकरितां शिवाजीनें रघुनाथ बल्लाळ सबनीस यास एकशे पंचवीस स्वार देऊन पाठविलें. (३) त्यानें हणमंतरावास ठार मारिलें. (४) नंतर तो शिवाजीकडे पुरंधरास आला. (५) शिवाजी निसणीच्या दारानें व रघुनाथ बल्लाळ रडतोंडीच्या घाटनें जावळीस आले. (६) तेथें लढाई होऊन चंद्रराव व त्याचे भाऊ बाजीराव व कृष्णराव व त्यांचे कबिले या सर्वास कैद केले.
येणेंप्रमाणें ह्या सहा बखरींतील कैफियतीं आहेत. जावळीची लढाई ज्यांनीं साक्षात् मारिली त्या शिवाजीची, राघो बल्लाळाची व संभाजी कावजीची प्रत्यक्ष जबानी मिळाली असती, तर ती पूर्ण प्रमाण म्हणून अवश्य मानावी लागली असती. चंद्रराव मो-यांकडील जबानी मिळाली असती, तर प्रतिपक्षाकडील म्हणणें काय आहे तें ऐकून घेतां आलें असतें. परंतु मुख्य वादी व प्रतिवादी ह्यांच्या अस्सल जबान्या म्हणजे अस्सल पत्रें, हकीकती वगैरे कांहीच उपलब्ध नसल्यामुळें केवळ बखरकारांच्या लिहिण्यावरून निकाल देण्याचा प्रसंग आला आहे. बखरकार झालेल्या प्रसंगांचें प्रत्यक्ष द्रष्टे नसून केवळ कर्णोपकर्णी व कदाचित् जुने दाखले वगैरे पाहून हकीकती सजविणारे लेखक आहेत. त्यांतल्या त्यांत मल्हार रामराव व शिवदिग्विजयाचा कर्ता ह्या दोघांनी काहीं जुने लेख पाहिले असावे असा संशय येतो.