सभासदी बखरीच्या चवथ्या परिशिष्टांत सोयराबाई शिरक्यांची कन्या होती म्हणून डफच्या आधारावर विधान केलें आहे. सईबाई मोहित्यांची कन्या म्हणून चित्रगुप्त म्हणतो [चित्रगुप्त ८९]. येणेंप्रमाणें शिवाजीच्या घरातील माहिती बिनचूक अशी फारच थोडी आहे व जी काही थोडीबहुत उपलब्ध आहे ती सर्व किंवा अंशतः खरी आहे असेंहि म्हणवत नाहीं. अमूक एका बखरींतील मजकूर खरा आहे असेंहि निश्चयानें सांगतां येत नाहीं व खोटा आहे असेंहि बिनधोक म्हणतां येत नाहीं. सारांश, या बखरींच्या आधारांवर निश्चयात्मक असें विधान काहींच करतां येत नाहीं; प्रत्येक गोष्टीविषयी संदेहवृत्तीचाच परिपाक विशेष होतो व आजपर्यंत जे शिवाजीचे वृत्तांत आपण वाचिलेले आहेत ते फक्त कल्पित कथांच्यापेक्षां जास्त विश्वसनीय आहेत हें पाहून इतर अस्सल पुराव्याची व रचनेची अपेक्षा उत्पन्न होते. जोंपर्यंत अस्सल पुराव्याचीं साधने उपलब्ध झालीं नाहींत तोपर्यंत ह्या बखरींचा उपयोग शंकास्थानें उत्पन्न करण्याचाच तेवढा होण्यासारखा आहे; कोणतीहि एखादी नवी बखर सांपडली व ती वर सांगितलेल्या तीन अस्सल वर्गांपैकीं नसली म्हणजे शंकांची मात्र जास्त जोड होण्याचा अवश्य संभव असतो. शिवाजीच्या गृहस्थितीबद्दल शंका काय काय उद्भवतात ह्याचा प्रपंच वर केला आहे. आतां शके १५६५ पासून १६०२ पर्यंतच्या शिवाजीच्या चरित्रासंबंधीं बखरींतील एक दोन शंकास्थानें काढून दाखवून हें प्रकरण आटोपतें घेतो.
पहिलें व दुसरें शंकास्थान निरनिराळ्या बखरींतील मजकुराच्या अनुक्रमासंबंधानें आहे ही शंकस्थानें वाचकांच्या स्पष्ट ध्यानांत यावी म्हणून प्रत्येक बखरींतील मजकुराच्या अनुक्रमाचे तक्ते खालीं देतों व नंतर त्यांतील संगती व विसंगती ह्याबद्दल दोन शब्द लिहितों.
[ १ ] शिवदिग्विजयांतील मजकुराचा अनुक्रम.
[ २ ] सप्तप्रकरणात्मक चरित्रांतील मजकुराचा अनुक्रम.
[ ३ ] सभासदी बखरींतील मजकुराचा अनुक्रम.
[ ४ ] चित्रगुप्ती बखरींतील मजकुराचा अनुक्रम.
[ ५ ] श्रीशिवाजीप्रतापांतील मजकुराचा अनुक्रम.
[ ६ ] रायरी येथील बखरींतील मजकुराचा अनुक्रम.