शके १५४१ पासून शके १५४९ पर्यंत शहाजीच्या हालचालींचा वृत्तांत कसाबसा थोडाबहुत दिला आहे. आतां शके १५४९ पासून शके १५५९ पर्यंत त्यानें काय केलें तेंहि बखरीच्या आधारानें सांगितलें पाहिजे. परंतु त्या वेळची हकीकत सांगतांना बखरकारांनीं जो घोटाळा केला आहे तो सांगतां पुरवत नाहीं. शहाजी, मलिकंबर, मुरार जगदेव व चतुर साबाजी ह्यांचीं नांवें पुनः पुन्हा उच्चारण्यापलीकडे बखरींतून जास्त व व्यवस्थित अशी माहिती यत्किंचितहि दिलेली नाहीं. मलिकंबर शके १५४८ त वारला असून त्याचें नांव पुढें हे बखरनवीस कसे घेतात ह्याचेंच आश्चर्य वाटतें. परंतु ह्याचें फारसे आश्चर्य वाटावयास नको. कां कीं खुद्द शिवाजी महाराजांच्या जन्माची जी तीथ व जो दिवस ह्या लोकांनीं दिला आहे व जो आजपर्यंत खरा म्हणून धरला गेला आहे तो देखील बहुशः चुकला असावा असें वाटतें. मल्हार रामराव व शिवदिग्विजयाचा कर्ता हे शिवाजी शके १५४९ प्रभव नाम संवत्सरे वैशाख शुद्ध २ गुरुवारीं रोहिणी नक्षत्रीं जन्मला म्हणून लिहितात. परंतु शके १५४९ च्या वैशाख शुद्ध द्वितीयेस गुरुवार नसून शनिवार आहे, ह्या अर्थी ह्या मितीवर विश्वास ठेववत नाहीं. प्रो. फारेस्ट यांनीं छापिलेल्या रायरी येथील बखरींत शिवाजीचा जन्मशक १५४८ म्हणून दिला आहे. रायरी येथील बखरीच्या मजजवळ असलेल्या मराठी प्रतींत शिवाजीचा जन्म शके १५४८ क्षयनाम संवत्सर वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार असा दिला आहे. परंतु शके १५४८ च्या वैशाख शुद्ध पंचमीस चंद्रवार नाहीं; तेव्हां हीहि मिती विश्वसनीय नव्हे, असें म्हणणें भाग पडतें. काव्येतिहाससंग्रहकारांकडे १८०१ सालीं धारेहून रा. काशिनाथ कृष्ण लेले यांनीं पाठविलेल्या एका जंत्रींत शिवाजीचा जन्मशक १५४९ प्रभवनाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी सोमवार म्हणून दिला आहे. शके १५४९ च्या वैशाख शुद्ध पंचमीस सोमवार सरतां सरतां रोहिणी नक्षत्र असावें असें वाटतें. तेव्हां ह्या शेवटल्या मित्तीस म्हणजे शके १५४९ प्रभव संवत्सर वैशाख शुद्ध पंचमी सोमवार रोहिणी नक्षत्रावर शिवाजीचा जन्म झाला हें विश्वसनीय दिसतें. १५४९ च्या वैशाख शुद्ध पंचमीला इसवी सन १६२७ च्या एप्रिलची १० तारीख होती. शिवाजी १६२७ च्या मेंत जन्मला म्हणून डफ म्हणतो तें अर्थात् बराबर नाहीं. मल्हार रामरावानें व शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें वैशाख शुद्ध द्वितीया गुरुवार ही तीथ कोणत्या हेतूनें दिली हें पाहणे थोडेसें अगत्याचें आहे. राजा म्हटला म्हणजे त्याला जन्मस्थ बहुत ग्रह उच्चीचे असले पाहिजेत ही समजूत फार पुरातन आहे. वैशाख शुद्ध पंचमीस सोमवारीं तसा कांहीं योग नसल्यामुळें वैख शुद्ध द्वितीया गुरुवार हीच तीथ पसंत करावी लागली. शिवदिग्विजयाच्या कर्त्याने तीन श्लोक दिले आहेत व त्या तिन्ही श्लोकांत वैशाख शुद्ध द्वितीया गुरुवार हीं अक्षरें स्पष्ट दिलीं आहेत. यद्यपि त्यानें व मल्हार रामरावानें बनावट तिथी देण्यास कमी केलें नाही, तत्रापि बनावट पुरावा जितका बेमालूम करावा तितका करण्याचें त्यांना किंवा त्यांनीं ज्या आधारावरून उतारा घेतला त्या मूळ श्लोककारांना साधलें नाहीं. बनावट पुरावा तयार करणा-यांना आपलें काम बेमालूम करण्याइतकें शास्त्रज्ञान प्रायः नसतें हें तरी मनुष्यमात्राचें सुदैवच समजलें पाहिजे! बनावट तिथी देणा-या मूळ श्लोककारांच्या किंवा टिप्पणकारांच्या मजकुरांत ह्या बखरनविसांनीं आपलें आणीक शहाणपण मिरविलें नाहीं, ही त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट आहे!
१५४९ पासून १५५९ पर्यंत शहाजीचा इतिहास मराठी बखरींत सांपडण्यासारखा नसून तो प्रायः मुसलमानी तवारिखांतून येणा-या उल्लेखांवरूनच रचिला पाहिजे. काव्येतिहाससंग्रहांत ४३८ नंबरची यादी शहाजीची कैफियत म्हणून दिलेली आहे. परंतु तींत शहाजीच्या व शिवाजीच्या नांवांचा उल्लेख अधूनमधून मात्र केला असून त्याच्यासंबंधीं विशेष माहिती फारशी दिलेली नाहीं. तींत शहाजहान व अवरंगजेब यांच्या पराक्रमांचें त्रोटक वर्णन असल्यामुळें ती काफीरखानाच्या इतिहासाचा सारांश असावा असें वाटतें. शिवाजीचा इतिहास देणा-या जशा दहा पांच छापलेल्या व न छापलेल्या बखरी उपलब्ध आहेत, तशा शहाजीचा वृत्तांत देणा-या बखरी मुळींच नसल्यामुळें शहाजीच्या संबंधीं ठाम अशीं विधानें दहापांचाहून जास्त करतां येत नाहींत. १५४९ च्या पुढें शहाजी बंडखोरांत निवडला गेल्यामुळें, त्याच्या अमलाखालीं ज्या प्रांतांत तो असे त्या प्रांताला सोडून जास्त प्रांत नव्हता हें स्पष्टच आहे. अशेरीपासून पेडगांवापर्यंत त्याची जहागीर सैरावैरा पसरलेली होती. तींतून सह्याद्रीच्या लगत्याचे प्रांत, विशेषतः पुणें व सुपे हे प्रांत १५४९ च्या पुढें त्याच्या हातांत राहिलें असावे. शहाजीला तोडण्यात फत्तेखानानें मोठेसें शहाणपण केलें असें नाहीं. त्या तोडण्यानें निजामशाहीचा एक वाली गेला व सरहद्दीवरील मुलखांवर स्वा-या करण्यास मोंगलांस उत्तम सोय झाली. शहाजी ह्यापुढें बहुतेक स्वतंत्र असाच राहूं लागला व त्याचा कित्ता दौलताबादच्या इतर सरदारांनींहि गिरविला. शिद्दी रेहानानें सोलापूर, शहाजीनें भीमगड, श्रीनिवासरावानें जुन्नर, खिद्दी साया सैफखानानें तळकोंकण व शिद्दी अंबरानें जंजिरा, असे प्रांत निरनिराळ्या किल्लेदारांनीं व जमीनदारांनीं वाटून घेतले. (का. पत्रें व यादी ४३८). १५५० त शहाजहानानें दौलताबादेवर स्वतः स्वारी केली, त्या वेळीं शहाजीनें खानजहान लोदीचा पक्ष घेतला. पुढें १५५१ त लोदीचा पक्ष दुर्बळ वाटल्यावरून शहाजी शहाजहानाचा बेविसहजारी मनसबदार झाला.