शिवाजी जातिवंत मराठा होता व त्याच्या घराण्याचा संबंध रजपुतांच्या घराण्यांशी लावण्याला ऐतिहासिक, शारीरिक व वांशिक हरकती अनेक येतात हें वरील विवेचनावरून स्पष्ट आहे. रजपूत व मराठे हे दोघेहि आर्यच होत. परंतु देशपरत्वें ह्या दोघांत शरीराच्या ठेवणीसंबंधानें भेद झाले आहेत हें लक्षांत घेतलें पाहिजे. आतां मराठे रजपूत नाहींत ह्या विधानानें थोडासा गैरसमज होण्याची भीति आहे. मराठे रजपूत नाहींत, ह्यांत तर संशयच नाहीं, पण तेवढ्यानें ते क्षत्रिय नाहींत असें मात्र बिलकुल म्हणतां येत नाहीं. दोन अडीच हजार वर्षांपूर्वीं जेव्हां प्रथम आर्य नर्मदेच्या दक्षिणेंतील प्रांतांत वसाहत करण्यास आले तेव्हां ते आपली चातुर्वर्ण्याची संस्था घेऊन आलेच असले पाहिजेत. त्या वेळचे जे क्षत्रिय तेच सध्यांचे मराठे होत. क्षत्रियांची जात महाराष्ट्रांत नष्ट झाली असा जो एक प्रवाद ऐकूं येतो तो वरील विधानाच्या पुढें फिक्का पडून जातो. ब्राह्मणाची जात जर अद्याप महाराष्ट्रांत आहे तर क्षत्रियांचीच जात महाराष्ट्रांत गुप्त कां व्हावी तें समजत नाहीं. अलीकडील अडीच हजार वर्षांत असा कोणता प्रलय झाला कीं तिनें क्षत्रियांचा लोप व्हावा? महाराष्ट्रांतील क्षत्रियकुलांची परिनालिका अशोकाच्या कालापासून ह्या वेळपर्यंत एकसारखी चालत आलेली स्पष्ट दाखवून देतां येते. ह्या परिनालिकेंत संकर जातींचा समावेश करतां येत नाहीं. अस्सल मराठा क्षत्रियांचा शूद्रादि जातींशीं शरीरसंबंध होऊन जी संतती झाली तिला क्षत्रियांच्या गोटांतून वगळणें रास्त आहे. परंतु ह्या अव्यवस्थित संबंधापासून झालेली संतती अमकीच असें दाखवून देणें अनेक कारणास्तव दुरापास्त आहे.
बखरनविसांनीं दिलेली वंशावळ अविश्वसनीय कां मानावी ह्यालाहि अशीं कारणें आहेत. सजणसिंहापासून कर्णसिंहापर्यंतची वंशावळ केवळ कृत्रिम भासते. ह्या कृत्रिम वंशावळींत सजणसिंहापासून बाबाजीपर्यंत १५ पुरुष दिले आहेत. बाबाजी शके १४५५ विजयनाम संवत्सरीं म्हणजे इ. स. १५३३ त जन्मला. दर पिढीला २६ वर्षें धरिलीं तर सजणसिंहाचा काल शके १०६२ च्या सुमाराला येतो व दर पिढीला २० वर्षें धरिलीं तर शके ११५२ येतो. परंतु सजणसिंह शके १२२५ च्या सुमाराला हयात असल्यामुळें वरील दोन्ही सन त्याला लागू पडत नाहींत. अर्थात, ह्या वंशावळीवर विश्वास ठेवण्यांत अर्थ नाहीं. शिवाजीचें मूळ रजपूत घराण्याशीं जोडून दिलें नाही तरी त्याचें क्षत्रियत्व कांहीं नाहींसें होत नाहीं. शिवाजीची आई जिजाबाई शिंदखेडच्या जाधवांची मुलगी होती. शिंदखेडचे जाधव म्हणजे देवगिरी येथें तेराव्या शतकाच्या प्रारंभीं राज्य करणा-या जाधवांचेच वंशज होत. तेव्हां मातृपक्षाकडून शिवाजी मराठा क्षत्रिय होता हें निःसंशय सिद्ध आहे. भोसल्यांचें कूळ महाराष्ट्रांतील पुरातन क्षत्रियांपैकीं होतें हें मागें सिद्ध करून दाखविलें आहे. त्याअर्थीं पितृपक्षाकडूनहि शिवाजीचें क्षत्रियत्व पूर्णपणें ठरतें. गागाभट्टादि मंडळींस शिवाजीच्या क्षत्रियत्वासंबंधानें शंका आली तिचें कारण त्या मंडळीचे पूर्वांपर इतिहासाचें अज्ञान होय. तें अज्ञान आधाराला घेऊन कृत्रिम वंशावळी ख-या मानण्याच्या भरीस आपण कां पडावें तें समजत नाहीं.
ह्या कृत्रिम वंशावळीचें लटांबर काढून टाकिलें म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या विश्वसनीय अशा जागेवर उभे राहिल्यासारखें वाटून पुढील कांहीं भागाचें परीक्षण विशेष भरंवशानें करतां येतें. बाबाजी भोसल्याचा जन्म शके १४५५ विजय नाम संवत्सरीं म्हणजे इ. स. १५३३ सालीं झाला म्हणून बखरकार जें सांगतात तें विश्वसनीय आहे. कां, कीं, ही माहिती बखरनविसांनीं स्वदेशांतील टिपणांवरून घेतली असून वंशावळीप्रमाणें परदेशांतील कृत्रिम टिपणांवरून घेतली नाहीं. बाबाजीच्या बापाचें नांव संभाजीं म्हणून होतें. बाबाजीला मालोजी व विठोजी हे दोन पुत्र अनुक्रमें शके १४७२ साधारण नाम संवत्सरीं व शके १४७५ प्रमादीनाम संवत्सरीं म्हणजे इ. स. १५५० त व १५५३ त झाले. मालोजीला जगदंबेचा दृष्टान्त शके १५१५ विजयनाम संवत्सरीं माघ शुक्ल १५ रविवारीं झाला म्हणून शिवदिग्विजयकार म्हणतो तें खरें आहे. त्यावर्षीं माघ शुक्ल १५ ला रविवारच होता.