शहाबुद्दिनापासूनच्या पुढील वंशावळी यवनांच्या तवारिखांतून घेतलेल्या आहेत. शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें यवनांच्या तवारिखा पाहिल्या होत्या, किंवा खरें म्हटलें असतां, ज्या यादींवरून त्यानें आपला मजकूर तयार केला, त्या यादींच्या कर्त्यांनीं तवारिखा पाहिल्या होत्या असें म्हटलें जास्त असतां शोभेल. यवनी वंशावळींतहि सर्व राजांचीं नांवें एका पाठीमागून एक अशीं बिनचूक दिलेलीं नाहींत.
वंशावळींत दिलेल्या सार्वभौम राजांपैकीं एक दोन वंशांतील राजाखेरीज महाराष्ट्राच्या इतिहासांशीं बाकीच्यांचा साक्षात् संबंध कांहीएक नाहीं. असें असतां, वंशावळी देण्याच्या खटपटींत बखरनवीस कां पडलें, असा प्रश्न साहजिक उद्भवतो. पुराणांतील पद्धतीला अनुसरून ह्या वंशावळी यादीकारांनीं व बखरनविसांनीं दिल्या असाव्या, हें एक उत्तर आहेच. तसेंच ज्या कालीं ह्या यादी लिहिल्या गेल्या, त्याकालीं दिल्लीपतीचें महत्त्व महाराष्ट्रांत फार झालें होतें. दिल्लीपती म्हणजे पृथ्वीपति; तेव्हां ज्यांना राज्य कमाविण्याची महत्त्वाकांक्षा असेल त्यांनीं दिल्लीकडे दृष्टी फिरविली पाहिजे, ह्या मुद्यावर यादीकारांनीं विशेष भिस्त ठेविली असावी, हें दुसरें एक उत्तर आहे. माझ्या मतें मुख्य उत्तर निराळेंच असावें. शिवाजीचा वृत्तांत देतांना शिवाजीच्या वंशाची उत्पत्ति रजपुतांच्या छत्तीस कुळांतील आहे, व ह्या छत्तीसकुळीच्या द्वारें शिवाजीचा संबंध युधिष्ठिरापर्यंत जाऊन पोहोंचतो ही गोष्ट ह्या बखरनविसांना मुख्यतः सांगावयाची आहे. यवनांनीं रजपुतांची कित्येक कुळें धुळीस मिळविलीं, त्यांपैकीं कांहीं रजपूत दक्षिणेकडे आले व त्यांतच भोसल्यांचे पूर्वजहि आले, वगैरे प्रसंगांचें त्यावेळच्या माहितीला धरून, संगतवार व समाधानकारक वर्णन देतांना ह्या पौराणिक व मध्ययुगीन वंशावळींचा प्रवेश बखरींतून स्वाभाविकपणेंच झाला. ह्या वंशावळी देण्यांत एक मुख्य हेतु व दोन गौण हेतु, मिळून एकंदर तीन हेतु बखरनविसांच्या मनांत होते असें दिसतें - (१) युधिष्ठिरापासून शिवाजीपर्यंत एकसारखी परिनालिका दाखवून द्यावयाची हा पहिला हेतु, (२) युधिष्ठिरापासून औरंगझेबादि मोंगलापर्यंत सार्वभौम राजांची मालिका दाखवून द्यावयाची हा दुसरा हेतु, व (३) दिल्ली येथील सावभौम मोंगलांची सत्ता तरवारीच्या जोरावर बसविलेली होती व त्यांना दिल्लीच्या गादीला पिढीजात हक्क कांहींएक नव्हता, हें दृष्टोत्पत्तीस येऊन शिवाजीला सार्वभौम सत्ता प्रस्थापित करण्याचा हक्क पिढीजात प्राप्त झाला होता, हेंहि वाचकांच्या ध्यानांत यावें, हा तिसरा हेतु. अशा त्रिविध हेतूनें प्रोत्साहित होऊन बखरनविसांनीं ह्या वंशावळी दिल्या आहेत. पुराणें, राजावली, तवारिखा वगैरे साधनांच्या सहाय्यानें मूळ यादीकारांनीं ह्या वंशावळी बनविल्या व त्यांवरून बखरनविसानीं त्या उतरून घेतल्या.
एक दोन घराण्यांखेरीज ह्या वंशावळीतील राजांपैकीं बाकींच्या राजांचा महाराष्ट्राच्या इतिहासाशीं साक्षात् संबंध यत्किंचित् हि नाहीं. शालिवाहन, अलाउद्दिन, शहाजहान, व औरंगझेब, वगैरे पांच चार नांवांचा मात्र निर्देश ह्या वंशावळींत केला आहे. परंतु तो दिल्लीचे सार्वभौम ह्या नात्यानें झाला असून, महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधानें बिलकुल झालेला नाहीं. अल्लाउद्दिन, शहाजहान व औरंगझेब ह्यांची माहिती सर्वत्र थोडी बहुत असल्यामुळें, त्यांच्या संबंधानें मला येथें विशेष कांहींच लिहावयाचें नाहीं. शालिवाहन ह्या नांवांसंबंधानें मात्र इतका उदासीपणा दाखवितां येत नाहीं. शालिवाहन अथवा शातवाहन हें नांव आपल्याला माहित असलेल्या महाराष्ट्रांतील राजांच्या वंशावळींतील आद्यतम म्हणून समजलें जातें. पैठणिक, राष्ट्रिक, महाभोज ही महाराष्ट्रांतील निरनिराळ्या प्रांतांतील लोकांचीं नांवें अशोकाच्या वेळींहि प्रसिद्ध होतीं हें जरी खरें आहे, तरी महाराष्ट्रांतील राजकुलांपैकीं अत्यंत पुरातन असें आपल्याला माहीत असलेलें नांव म्हटलें म्हणजे हें शालिवाहनाचेंच होय. शातवाहन हें कुल आंध्र असल्याकारणानें शातवाहनाच्या वेळचे मराठे पैठण येथील आंध्र राजांच्या परकीय अमलांखालीं होते असें म्हणावें लागतें. ह्या आंध्रराजांच्या विरुद्ध त्या वेळच्या कांहीं महारथींनीं म्हणजे मराठ्यांनीं क्षत्रपांच्या दरबारीं खटपट करून आंध्रराजांच्या ताब्यांतील जुन्नर वगैरे कांहीं प्रांत क्षत्रपांच्या हातीं दिले, असें आंध्रांच्या व क्षत्रपांच्या नाशीक व कार्ले येथील शिलालेखांवरून अनुमान होतें.