Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तुतची पत्रें बहुतेक १७०७ पासून १७६१ च्या अवधीतील आहेत. ह्यांत वाई येथील शेखमिरे, ओझर्डे येथील पिसाळ व मुख्यत्वें करून धावडशी, पिंपरी, पेढें व गोठणें येथील ब्रह्मेंद्रस्वामींचे वहिवाटदार वगैरे ग्रहस्तांच्या दफ्तरांतील अस्सल लेख येतील. प्रत्येक लेखाच्या मथळयावर त्या त्या लेखाची इंग्रजी तारीख दिली आहे. क्वचित टीपाही दिल्या आहेत. ह्या दोन चार दफ्तरांतील महत्त्वाची अशी सर्व पत्रें छापण्यास पाच सहाशें डेमी पृष्ठे लागतील. सर्व पत्रें छापून झाल्यावर शेवटी इ. स. १७०७ पासून १७६१ पर्यंतच्या इतिहासाच्या रचनेस कोणतें साहाय्य झालें, तें इत्थंभूत सांगण्याचा विचार आहे. धावडशी येथील दफ्तरासंबंधानें एक गोष्ट मुद्दाम नमूद करून ठेवण्यासारखी आहे. त्या दफ्तरांत इ. स. १७२८ पासून १७४५ पर्यंतची ब्रह्मेंद्रस्वामींची रोजकीर्द बहुतेक शाबूत आहे. अर्थशास्त्र्यांना तिचा उपयोग विशेष होईल. तींतील धान्याच्या किमती, व्याजाचे दर, जमिनीवरील कर, वगैरेंच्या यादी पुढेंमागें देण्याचा माझा संकल्प आहे. प्रथमपासूनच ह्या यादींना प्रारंभ करणार होतो; परंतु पत्रें छापून झाल्यावर मग ह्या यादी हाती घ्याव्या असें कित्येकांचें सांगणें पडलें. तें मान्य करून स्वामींच्या खासगी व राजकीय पत्रांसच सध्यां प्रारंभ केला आहे. स्वामींची रहाणी स्वभाव व चरित्र ह्यांवर ज्यानें कोणत्याही प्रकारचा प्रकाश पडेल असें वाटलें, तें पत्र प्राय: गाळलें नाहीं. ही पत्रें वाचतांना स्वामींच्या स्वभावाची निरनिराळी अंगें वाचकांच्या दृष्टोत्पत्तीस पडतील. कित्येक स्थळी स्वामी एखाद्या पाटलाशीं भांडतांना दृष्टीस पडतील, तर कित्येक ठिकाणी छत्रपतीसारख्यांनाही चापतांना आढळतील. कोठें धाबळीकरिता भिक्षा मागताना स्वामींना पहावें, तर कोठें लाखों रुपयांचें जडजवाहीरही करताना ते दिसतात. असें शेकडों आविर्भाव स्वामींच्या स्वभावाचे आहेत. ते ज्या ज्या पत्रांतून दिसून आले, तें तें पत्र संग्रहांत सामील केले आहे. स्वामींच्या पत्रांशिवाय १७०७ पासून १७६१ पर्यंतच्या इतर पत्रांचाही येथें समावेश केला आहे.

पत्रांच्या मथळ्यावर इंग्रजी तारखा घातल्या असल्यामुळें व प्रत्येक पत्र तुटक असल्यामुळें, पत्रें, सालवारीनें लावण्यापासून विशेष फायदा दिसत नाही.

कालानुरोधानें संगतवार न लावण्याचें एक कारण आहे. तें हें कीं, १७०७ पासून १७६१ पर्यंतच्या अवधींतील पत्रें दर आठवडयास नवीं नवीं उपलब्ध होत आहेत. आजपर्यंत मिळालेली पत्रें संगतवार तेवढीच प्रथम छापून काढण्याचा संकल्प केल्यास तो संकल्प फारच अडचणीचा होतो. नवी सांपडलेली कांही चिटोरी जुन्या संगतवार लावलेल्या पत्राहून १७०७ च्या जवळची कधी कधी असतात. ही १७०७ च्या जवळचीं चिटोरी अगोदर छापणे हीच खरी संगति होय. सारांश पत्रांची संगत अमूक एका पध्दतीनें सोयीची व कायमची लागेलच अशी खात्री नसल्यामुळें, केवळ उपलब्धि व महत्त्व यांजकडे दृष्टी देऊन ही पत्रें छापिली आहेत. बहुतेक प्रत्येक पत्राची तारीख पत्राच्या मथळयावर दिली असल्यामुळें, पत्राचें अनुसंधान कळण्यास विशेष अडचण पडावी, असें वाटत नाहीं. ज्या पत्रांची इंग्रजी तारीख काढण्यास अंतस्थ चिन्ह कांहीच नाहीं ती पत्रें तारखेशिवाय छापिली आहेत.