Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तावना 

२९. छत्रपती व त्यांच्या राण्या ह्यांच्याशीं स्वामीचें वर्तन अदबीचें असे. ब्रह्मेंद्रस्वामी भार्गवाचा अवतार आहे ह्या कल्पनेने शाहूच्याहि मनांत ब्रह्मेंद्राविषयीं पूज्यबुद्धि असे. भार्गवरामाचा व क्षत्रियाचा पौराणिक संबंध छत्रपतीला पूर्ण अवगत असल्यामुळें, ब्रह्मेंद्राशीं शाहू आदबशीर प्रेमानें वागे. छत्रपतींपेक्षां छत्रपतींच्या राण्यांशीं ब्रह्मेंद्राचा संबंध विशेष असे. शाहूला पुत्रोत्सवाचें सुख माहीत नसल्यामुळें, त्याला व त्याच्या राण्यांना पुत्रसंतानाचा आशीर्वाद ब्रह्मेंद्र दरवर्षी देत असे. एकदां तर स्वामींनें “पुत्रसंतान व्हावें ऐसें वोशध” सगुणाबाई राणीला भावार्थे प्रातःकाळी घेण्यास दिलें (पा. ब्र. च. ले. २६३) ह्या आशीर्वादाचा व वोशधाचा बिलकुल उपयोग झाला नाहीं हें प्रसिद्धच आहे. तत्रापि शाहूचा राण्यांचा त्याजवरील विश्वास तिळमात्रहि कमी झाला नाहीं. ह्या पुत्रसंतानाच्या आशीर्वादिक देणगीशिवाय राण्यांशी स्वामीचें इतरहि दळणवळण असे. शाहूच्या राण्या सर्व प्रकारच्या राजकारणांत लहानसहान ढवळाढवळ करीत असत. त्या ढवळाढवळींत स्वामीहि लुडबुड करावयाचा प्रयत्न करी. राजकीय प्रसंगासंबंधानें अष्ट प्रधानांशीं किंवा शाहूर्शी राजरोस रीतीनें ब्रह्मेंद्र व्यवहार करण्यास फारसा धजत नसे. अशा सबंधांनें स्वामी शाहूच्या राण्यांचेच द्वार पहात असें. १७३३ त व १७३४ त कोंकणांत हबशाशीं युद्ध चाललें असतांना, मुंबईचा इंग्रज शामळाला मदत करून मराठ्यांना बरीच अडचण करीं. ह्या अडचणीची वार्ता ऐकून इंग्रजाला बंद करण्याचा बूट ब्रह्मेंद्राच्या मनांत आला. हा बूट, खरें पाहिलें तर, स्वामीनें बाजीरावाला किंवा शाहूला कळवावयाचा. परंतु आपल्या सूचनेचा आदर परमार्थाने कोणी करील अशी खात्री नसल्यामुळें, स्वामीनें सखवारबाईकडे ह्या विषयासंबंधीं बोलणें काढिलें. मुंबईकर इंग्रजांची व आपली मैत्री आहे, असें एक दोन इंग्रजांची व स्वामीची गांठ पडल्यावरून स्वामीस वाटत होतें. ह्या औट घटकेच्या मैत्रीवरून इंग्रज आपला हुकूम ऐकेल असेंहि ह्या नवशिक्या मुत्सद्याचें मत होतें. हें मत दोन तीन वेळां स्वामीनें सखवारबाईंपुढें मांडलें (पा. ब्र. च. ले. ९ व १०) व दोन्ही तिन्ही वेळां, इंग्रजांना सांगून पहा, असें उत्तर तिने त्याला दिलें वास्तविक रीत्या काम करू लागण्यास एवढें आश्वासन बस होतें. परंतु नाकर्त्या मनुष्याप्रमाणें स्वामीनें पुन्हां तोच प्रश्न खुळसटपणानें सखवारबाईंपुढे नव्यानें ठेविला (पा. ब्र. च. ले. १०२). ह्या ताज्या दमानें मांडिलेल्या जुन्या प्रश्राला सखवारबाईनें किंचित् झणझणीत उत्तर दिलें तें, स्वामीची राजकारणप्रसंगांत कितपत पत होती ह्याचें उत्तम निदर्शक आहे. सखवारबाईनें लिहिले की, ह्या राज्यकारभाराच्या गोष्टी आहेत; केवळ आमच्यासारख्या पडतपोशीच्या स्त्रियांच्या करवीं छत्रपतींवाचून ह्या गोष्टी होतात असा अर्थ नाही; तेव्हां राजश्री स्वामींच्या (शाहूच्या) आज्ञेनें जें कर्तव्य तें केलें पाहिजे; महालतर्फेने म्हणजे आमच्यासारख्या स्त्रियांशीं बोलून तें काम होत नाहीं. (पा. ब्र. च. ले. १०२). सखवारबाईनें छत्रपतीकडे जाण्यास सांगितल्यावर, इंग्रजांच्या मैत्रीचा उपयोग करून घेण्याचा स्वामीचा प्रयत्न फारसा पुष्ट झाला नाहीं असा संशय येतो. कां कीं १७३९ त कप्तान इंचबर्डाशीं करार होई तोंपर्यंत इंग्रज हबशाला व फिरंग्याला मदत करीत होता हें सुप्रसिद्ध आहे. १७३४ त स्वामीची इंग्रजांशीं मैत्री जर उपयोगाची झाली असती तर १७३५, १७३६ व १७३७ ह्या सालांत इंग्रजानें हबशांना मदत केली नसती.