Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तावना 

ज्या स्वामीनें बाजीरावाची इतर प्रसगीं वाटेल ती अंगेजणी करावी, त्याच स्वामीनें बाजीरावाला इतके नमवावें, हें महत्वाकांक्षी व ढोंगी मानवी स्वभावाला अनुरूपच आहे. लाखों रुपये ज्यांचे देणें त्यांचे तगादे उंबरठ्यावर आले असतां नम्रतेचें एक वाक्यहि ज्या पुरुषाच्या तोंडून कल्पांतीहि निघावयाचें नाहीं, त्या बाजीरावाला स्वामीसारख्या मनुष्यापुंढे रडगाणें गाऊन दीनतेच्या गोष्टी बोलण्यास कमीपणा वाटत नसे. परमहंसत्वाचा दर्जाच असा कांही आहे कीं, त्यापुढें वाटेल त्यानें आपलें वाटेल तें गुह्म बिनबोभाट बोलावें. शिवाय बाजीरावाचे व ब्रह्मेंद्राचे नाते गुरूशिष्यत्वाचें असल्यामुळें व परस्परांना परस्परांची जरूर असल्यामुळें, एकमेक एकमेकांचा कमीपणा गोपन करीत व एकमेक एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवीत. एकाच धंद्यांतील माणसें अन्योन्यहितार्थ एकमेकांवर विश्वास कसा ठेवतात हें ह्या दोघांच्या चरित्रावरून शिकण्यासारखें आहे. ब्रह्मेंद्र कितीहि चुकला तरी त्याच्यावरील आपला विश्वास ढळूं द्यावयाचा नाहीं असा बाजीरावाचा कृतसंकल्प होता. ह्याचें एक मासलेवाईक उदाहरण देतों. १७३७, १७३८ व १७३९ हीं तीन सालें वसईवरील मोहीम चालली होती. बाजीरावाचें गुरुत्व स्वामीकडे असल्यामुळें बाजीरावाच्या मोहिमेंना बह्मेंद्र आशीर्वाद देत असे. पेशव्यांनीं शरीरद्वारा मेहनत करावी व ब्रह्मेंद्रानें ईश्वरावर संकट घालून मोहिमेस यश आणावें असा श्रमविभाग असे. उपासना व आशीर्वाद ही मोहिमा फत्ते करण्याचीं स्वामीचीं दोन जबरदस्त आयुधें असत. त्याप्रमाणें १७३७ तील वसईवरील मोहिमेस स्वामीनें आपला आशीर्वाद, वसई लवकरच फत्ते होईल, असा दिला परंतु त्या सालीं वसई लवकर फत्ते होईल असा रंग दिसेना. पुढें १७३८ त चिमाजी पुन्हां वसईवर गेला; परंतु त्यावेळीहि वसई फत्ते होण्याचा योग जुळून आला नाहीं. वसईचें काम फत्ते होई तें करणार स्वामी समर्थ आहेत, म्हणून बाजीरावानें स्वामीस १७३८ च्या १० जानेवारीस लिहिलें होतें (पा. ब्र. च. ले. ११६). धारावी, ठाणें वगैरे स्थलींच १७३८ चा मोसम गेल्यामुळें वसई ह्या वर्षीहि सई झाली नाहीं. तेव्हां फिरंग्याशीं तह करून घेण्याचें बाजीरावाला ब्रह्मेंद्रानें सुचविलें; परंतु बाजीरावानें तो उपदेश अमान्य केला (पा. ब्र. च. ले. ३७). ह्यावर १७३९ च्या १२ व १५ जानेवारीस बाजीरावानें वसईच्या आशीर्वादाची स्वामीस दुबार आठवण करून दिली (पा. ब्र. च. ले. ११९ व ३९). ह्या दुबार आठवणीनें चिरडीस जाऊन, वसई न आली तर या राज्यांत राहील त्याचें संन्यासपण लटकें, अशी ईरेची प्रतिज्ञा स्वामीनें केली (पा. ब्र. च. ले. २१९) व शिमगी पौर्णिमे अलीकडे म्हणजे १७३९ च्या १२ मार्चाच्या अगोदर वसई सई होईल म्हणून १७३९ च्या ४ फेब्रुवारीस अभिवचन दिलें (पा. ब्र. च. ले. ५१). त्याप्रमाणें १७३९ च्या ६ फेब्रुवारीस म्हणजे माघ शुद्ध दशमीस वसईस चिमाजीनें मोर्चे लाविले (पा. ब्र. च. ले. ५२). पुढें महिन्याभराने १७३९ ची १२ मार्च म्हणजे शिमगीपौर्णिमा तीं आली; तरीहि वसई सई झाली नाहीं, व स्वामींचें भाकीत खोटें ठरलें. इतकें झालें तरी पेशव्याची स्वामीवरील श्रद्धा रेसभरही कमी झाली नाहीं. शेवटी ५ मे १७३९ त वसई सर झाली, व चिमाजीने ब्रह्मेंद्राच्या भुलोबाला नवसाच्या १२५ पुतळ्या पाठवून दिल्या. ब्रह्मेंद्रस्वामीचा आशीर्वाद तीन वर्षे खितपत पडला असतांहि पेशव्यांची त्याजवरील श्रद्धा कायम राहिली, हीच ब्रह्मेंद्रस्वामीच्या वजनाची खरी गुरूकिली आहे.