Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[१५३]                                                                        श्री.                                                            १२ जानेवारी १७५१.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री विठ्ठलजोशी रघुनाथजोशी स्वामीचे सेवेसी:-
पोष्य गोविंद बल्लाळ स॥ नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कूशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. पुणेयांत तूर्त ऐवज रुपये लाख पावेतों देणें आहे. त्यास कांहीं ऐवज पुणेयांत आहे तो ते देतील. बाकी भरतीस ऐवज पाहिजेसा जाला तर लाखांचे भरतीस ऐवज चिरंजीव बाबूराव आणवितील तो पाठवून देणें आणि आह्मास लिहून पाठविणें. मित्ति माघ वद्य ११. बहुत काय लिहिणें. कृपालोभ असो दीजे. हे विनंती.



[१५४]                                                                        श्री.                                                               ८ डिसेंबर१७५०.

अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ गोसावी यासी :-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार, सु॥ इहिदे खमसेन मया अल्लफ. येथें दाभाडियासी कजिया प्राप्त जाला व ताराबाईंनीं राजश्रीस गडावर अडकावून ठेविलें. आमचेठायीं विषम मानून आहेत. नानाप्रकारें मनसबे करितात. असो. श्रीकृपेनें उत्तमच होईल. गुदस्तापासून फौज घरीं बसली, याजमुळें चाळीस लाख कर्ज जालें, पुढेंहि होतच आहे. फौजेचे समजाविशीस तोटा पांच सात लाख जाला. कर्जहि मिळत नाहीं. गुजरातेंतूनहि पैसा येणें दिसत नाहीं. सविस्तर तुह्मी समजून, खावंदाची ओढ जाणून, हरप्रकारें ऐवज प्रविष्ट करावा. कांकीं फौजेनें जसे सरदार मातबर तैसे मुलकाच्या रीतीनें तुह्मी मातबर. या गोष्टीचें अगत्य तुह्मास असावें. सारांश, तुमच्या तालुकियांपैकीं शिबंदीखर्च वगैरे महालमजकूर मिळोन जातो, बाकी सरकारांत थोडा ऐवज येतो. याची माहीतगिरीनें चौकशी करून, रुपया द्यानतदारीचे रीतीनें साधून, सरकारच्या कर्जास हात लावावा. वरकड तुमचे बोलल्यावर सातारा इस्तावे करार केले. त्यांपैकीं तूर्त ऐवज रोजमरियास रवाना करावा; बहा खर्च केवळ तोडून, रुपया जमा करून कर्ज वारावें. तुह्मास करावयासी योग्यता आहे हें जाणोन लिहिलें. या पत्राचें उत्तर तपशिलें न लिहिणें. जेणेंकरून सरकारची वोढ वारेल तैशी तरतूद करणें. जाणिजे. छ १९ मोहरम.