[५२२] श्री. २१ मे १७६१.
पे॥ ज्येष्ठ वद्य ५ सोमवार
शके १६८३ वृषानाम संवत्सरे.
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री गोविंद दीक्षित पाटणकर यांप्रती श्रीहून बाळकृष्ण दीक्षित पाटणकर आशीर्वाद उपरि येथील क्षेम ता ज्येष्ठ वद्य ३ गुरुवार जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष. श्रीमंत राजश्री भाऊ यांचे लढाईचें वर्तमान तो पूर्वीं लिहिलेंच होतें त्यावरून कळलेंच असेल. लढाई जाहलियानंतर अंतर्वेदीतील अम्मल उठिला होता तो फिरून पहिल्याप्रमाणें बसला. बुंधेलखंड व माळवा येथें जमीनदारांनी धामधूम केली होती त्यांसही शह देऊन अम्मल बसविला. सांप्रत जानोजी भोसले रेवामुकुंदपुरावरी फौजेसमेत आहेत. नवाब सुजावतदौला काशीस आले आहेत. येथील राजा पारीं पहाडांत गेला आहें. आजी तीन चार मोकाम आहेत. येथून पटण्यास जावयाची वार्ता आहे. शाहजादाही तेथें आहे. पुढें जो प्रसंग होईल तो लेहून पाठवूं. नवाब येथें आले आहेत, परंतु रयतेवरी बहुत कृपा करितात. शहरांत कोणास काडीइतका उपद्रव नाही. लोकांस ताकीद मोठी आहे. कळलें पाहिजे. विशेष. श्रीमंत रा पंतप्रधान इकडून देशास गेले ते कोठें आहेत ? पुढें मनसबा काय आहे ? तो लिहिणें. व रा मल्हारबा इंदुरी आहेत, देशास जाणार ह्मणून वार्ता आहे. तरी तिकडील सविस्तर वर्तमान लिहिलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. लोभ असावा हे आशीर्वाद.