[५१९] श्री. २० एप्रिल १७६१.
पे॥ ज्येष्ठ वद्य २ शुक्रवार.
शके १६८३.
सहस्त्रायु चिरंजीव गोविंद दीक्षित यांप्रती बाळकृष्ण दीक्षित अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें त्यांत, श्रीमंतांची भेट घेतली बहुत श्रीमंतांनी सन्मान केला, ह्मणून लिहिलें. तरी त्यांस उचितच आहे. विशेष. येथून हुंडया पाठविल्या त्या पावल्याचें उत्तर लिहिणें. जमा करून ठेवणें. विशेष. आह्मी श्री सोडून बाहेर दोन मास आहों. परंतु स्वोत्कर्षाचें वर्तमान आतां येऊं लागलें तेणेंकरून चित्त स्वस्थता झाली.* विशेष. येथें राजानें ह्या दिवसांत बहुत परामृष केला तेणेंकरून श्रींत बहुतांची अब्रू राहिली. आणि आमच्याविषयीं तों सर्वांस हेंच सांगितले जें माझी आणि बाळकृष्ण दीक्षितांची भिन्नता नाहीं, ज्यास मला उपद्रव करावयाचें सामर्थ्य असेल त्याणें यांस उपद्रव करावा. ऐसा अहंकार धरून उपद्रव होऊं दिला नाहीं. ब्राह्मणभोजन आदिकरून सर्वां गोष्टींचा आपण समाचार घेत असे. ऐशी विशेषेंकरून प्रीति केली. सर्वांस आपलेकडील मुत्सदि यांस सांगितलें जें, मी कैलासवासी नारायण दीक्षित यांचा लेक, मला त्यांचे व्रत चालवणें जरूर त्यांचे माणसाशीं कोणी मुजाहीम होई तरी नि:शंकाविना आज्ञेवांचून तोंड फोडा. ऐशी नित्य ताकीद करीत असे. आणि आमच्या शिवास आज्ञा केली जे, तुमचे दीक्षितांचे असतील व बैतल माल दीक्षितांसी सोडविला आहे, त्यांस कोणी धादा पाठविला तरी ज्याप्रमाणें दीक्षितांचे वेळी साहित्य लोकांचें होत असे त्याप्रमाणें करीत जाणें, तुझें ह्मटलें कोणी न आयके तरी मला सांगणें, मी त्यांचे पारपत्य करीन. ऐसें सांगितलें; आणि त्याजप्रमाणें दोन महिने चालविलें. कळावें. सर्वत्र वडिलांचे पुण्येंकरून निर्वाह होतो. आतां पुढेंही वडिलांचेच पुण्येंकरून चालेल. आतां आह्मी दो चौ दिवसांत श्रीस जाऊं. चिंता न करणें. राजाचेच जाग्यांत आहों. बहुत काय लिहिणें. हे आशीर्वाद.