[५१८] श्री. १६ एप्रिल १७६१.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री गोविंद दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी उध्दव वीरेश्वर सा नमस्कार विनंति येथील कुशल चैत्र शुध्द १२ गुरुवार पूर्वरात्र प्रहरपर्यंत यथास्थित जाणून स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष. स्वामीनीं कृपा करून पत्र पाठविले तेथें मजकूर. श्रीमंत राजश्री भाऊसाहेबांचें संतोषाचें वर्तमान सांप्रत तुह्मांकडे आलें आहे तें सविस्तर लिहून पाठवणें ह्मणून. त्यास, आज तीन दिवस जाहाले. रामनवमीचेच दिवशीं रा मोहनजी नानाजी यांचे पत्र खानापुराहून आलें. तेथें त्यांणीं लिहिलें होतें, व देवगांवास गृहस्थ राहतात त्यांचे पुत्राचे माळव्यांतून पत्र सातवे साबानचें खानापुरास चैत्र शुध्द अष्टमीस आलें. त्याची नक्कल पाठविली होती. त्यांत लिहिलें होतें जे :- श्रीमंत राजश्री भाऊसाहेब रामशिंग राजासुध्दां पंचवीस हजार फौजेनिशी ग्वालेरीस आले. या प्रांतांतून श्रीमंत थोरले साहेबांनी राजश्री बापूजी नाईक वगैरे सरदार वीस हजार फौज रवाना केली. तेहि ग्वालेरीस गेली. श्रीमंतांची व त्यांची भेटी जाहाल्या असतील ऐसें त्यांनी लिहून पाठविलें. दुसरे तेच दिवशी उज्जनीहून जासूद येथीलच लष्करांत आले. गांवचे पागेस चाकर आहे. तो सव्विसावे साबानी उज्जनीहून निघाला. त्याणें सांगितलें कीं, मारवाडांतून राजश्री जनकोजी शिंदे यांचे पत्र आलें जें :- श्रीमंत भाऊसाहेब आह्मी सुखरूप आहों. त्यांजबरोबरच भाऊसाहेबांचें पत्र होतें. त्यास, दोनी जासूद जाट होते. मार्गीं गवासांचे गांवी चौकीवर सांपडले. त्यावेळेस भाऊसाहेबांचे पत्र हिरावून घेऊन, जाटाचा हात तोडून, निरोप दिल्हा. ते दोघेजण उज्जनीस श्रीमंत साहेब रामरायाचे हवेलींत होते. देशास जावयाची मसलत होतीं; परंतु जनकोजींचे पत्र व जासूद मध्यरात्रीस येऊन पावले. तेच वेळेस दोन सांडणीस्वार व चार जासूदजोडया श्रीमंत दादासाहेबांकडे रवाना करून, खासा कुच करून, पुढें सा कोसांवर जाऊन मुक्काम केला. मग उजाडल्यावर जासूद इकडे निघाला. जाट दोघेजण आले, त्यांसव दोन कडी सोन्याची बक्षीस दिलीं. याप्रमाणें जासुदानें जबानी वर्तमान सांगितलें. याप्रमाणें दोहींकडून वर्तमान आलें. त्यांचा एक भाव आला त्याजवरून आश्वासन वाटतें. आमचे जासूद लष्करांत गेल्यास आज पंधरा दिवस जाहाले. तेही आठ चार दिवसांत येतील. याप्रमाणें आढळलें वर्तमान तें लिहिलें आहे. लष्करांतून सरकारचें पत्र आल्याउपरही स्वामीस कळवूं. सेवेसीं निवेदन होय. आह्मांस कोणा मातबराचें लिहिलें आलें नाहीं. दोहींकडून वर्तमान आलें तें निवेदन केलें आहे. बहुत काय लिहिणें. लोभ कीजे. हे विनंति.