[५१७] श्री. पे॥ ९ एप्रिल १७६१.
पे॥ चैत्र शुध्द ४ गुरुवारी,
हस्तें गणू. शके १६८३ वृषानाम.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री गोविंद दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. अबदालीचे व आपले फौजेचें युध्द तुंबळ जहालें; आपले सरदारांस जिकडे फावलें तिकडे गेले; इकडे नाना प्रकारें वर्तमानें येतात; तरी तथ्य वर्तमान ल्याहावें ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास युध्द मोठें जहालें. विश्वासराव अभिमन्यूप्रमाणें रणभेदून कैलासवासी जहाले. चिरंजीव भाऊ व जनकोजी शिंदे अलाजाटाच्या मुलखांत आहेत. दहा पांच बातम्या आल्या. शोधास माणसें कारकून गेले. लौकरच त्यांचे हातचें पत्र घेऊन येतील. राजश्री मल्हारजी होळकर वगैरे सरदार ग्वालेरीस आले. इभराईमखान त्यांस पाडाव जाले. जुंझ. सरदार व लोक मारले गेले. युध्दच आहे ! यश अपेश ईश्वराधीन ! असो ! चिंता काय ? पुढेंही जे तरतूद होणें ते होते. तुह्मी तिकडील लिहीत जावें. बहुत काय लिहिणें. हे विनंति.