[५१६] श्री. ११ मार्च १७६०.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी –
चरणरज बापूजी महादेव भट सा नमस्कार विनंति येथील क्षेम चैत्र वदि ११ गुरुवार पावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून श्रीत आनंदरूप असो. स्वामीचे आशीर्वादपत्र सांप्रती आलें नाहीं. तरी कृपा करून पाठविलें पाहिजे. तेणेंकरून संतोष होईल. तिकडे श्रीमंतांशी व यवनाशी युध्द लागलें. त्याचा परिणाम कसा लागेल तें न कळें. सख्य जालें असेल तरी स्वामी र॥ बाबास लिहितीलच. विशेष. हस्तनापुरास गिलजी, पठाण, अबदाली आले. ते जयनगरा अलीकडे पंधरा कोसांवर आहेत. हरिभक्तांच्या फौजा पंधरा सोळा कोसांवर सडे आहेत. दत्तोजी शिंदे दिल्लीवर युध्दीं पडले. बाकी पळोन सर्व गेले. बुणगे लुटले गेले. राजश्री मल्हारराव सुभेदार वृध्द जाले. घोडयावर बसून युध्द करावयासी सामर्थ्य नाहीं. राजी जनकोजी शिंदे जखमी. दंडावर गोळीची जखम आहे. जेव्हां भरेल तेव्हां खरी. युध्द कोणी करावें ? हरिभक्तांचें सत्व गेलें. काळ फिरलासा दिसतें. परंतु अबदाली गरमीचे दिवसांत रहात नाहीं. रोहिला गंगेचे उत्तर पारीचा त्याणें अबदालीस आणिलें. तीन क्रोडी रुपये देऊ केलें. अबदाली मागतों. रोहिलेयानें उत्तर दिले :- मजपाशी कांही नाहीं. तुह्मी गेलेत तरी मी मेला जातों. अयोध्येस ताधारियापासून क्रोडी घेणें. जाटापासून क्रोडी घेणें. माधोसिंगापासून क्रोडी घेणें. तरीच धन मिळेल. अबदालीस एक कवडीही मिळाली नाहीं. कळलें पाहिजे. सर्व वर्तमान राजश्री बाळकृष्ण दीक्षितांनी लिहिलें असेल. त्याजवरून निवेदन होईल. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विज्ञापना.