[५१५] श्री. १५ फेब्रूआरी १७६१.
तीर्थस्वरूप राजश्री दादा स्वामी वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें बाळकृष्ण दीक्षित पाटणकर कृतानेक सा नमस्कार विनंति येथील क्षेम ता माघ शुध्द एकादशी रविवारपरियंत वडिलांचे आशीर्वादेंकरून सुखरूप असों. यानंतर नवाब काशीहून कुच करून शुक्रवारीं गेला. एक लक्ष रुपये राजाचे दिल्हे. बाकी ऐवज देणें आहे तोही जीवनपुरास गेला ह्मणजे पांचपरियंत द्यावेसें केलें आहे. बाकी तेथून पुढें जाईल तेव्हां द्यावयाचा करार आहे. राजाही शुक्रवारीं तिसरा प्रहरा पारीं लष्करसमेत आला आहे. कळलें पाहिजे. दिल्लीकडील वर्तमान आह्मांस जें कळलें तें पूर्वीं लिहिलेंच आहे. वडिलांस कांहीं अधिकोत्तर कळलें असलें तर लिहिलें पाहिजे. वरकड वर्तमान वो रा गंगाधरभट पुराणिक सांगतां कळों येईल. बहुत काय लिहिणें हे नमस्कार.