[५१३] श्री.
विज्ञापना ऐसीजे राजश्री आत्माराम नाइकीं सांगोन पाठविलें कीं युध्द मोठें जालें उपर श्रीमंत भाऊ उभयता निघोन दिल्लीस दाखल जाले. ऐसें वर्तमान सांगोन पाठविलें तें स्वामीस कळावें ह्मणून लि असें. आपणही तेथें कांहीं अधिकोत्तर ऐकिलें असिलें तर ल्याहावें, अनमान करावा. हे विनंति. धोंड जोशी यासी का ३५०० साडे तीन हजार पौष वद्य १० दशमीच्या मित्तीनें देऊन चिट्टी लध्धूची पाठविली आहे. ते घेणें आणि रुपये जमा करणें. हे विनंति.
[५१४] श्री. १३ फेब्रूआरी १७६१.
पो चैत्र शुध्द ७ मंगळवार.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेवबावा दीक्षित स्वामीचे सेवेसी –
सेवक जानोजी भोसले सेनासाहेबसुभा दंडवत विज्ञापना येथील कुशल ता छ ७ माहे रजबपर्यंत मुक्काम करंडी सेवकाचे वर्तमान यथास्थित असे. यानंतर स्वामीचे भेटीची बहुत अपेक्षा आहे. यास्तव आपणाकडे पत्रें लेहून जासूदजोडी पाठविली आहे. ऐशीयासी, उदयिक मंगळवारीं आमच्या मुक्काम दुधनातीरीं करंडीवर आहे. तेथून दरमजल सत्वरच वराड प्रांतीं जाणें आहे. येविशींचा अर्थ सेवेसी लिहिला आहे. तरी स्वामींहीं करून सत्वर भेटीस आलें पाहिजे. येतेसमयीं राजश्री शामराव विश्वनाथ यासमागमें घेऊन यावें. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञप्ति.