[५१२] श्री. २७ जानेवारी १७६१.
पो फाल्गुन वद्य १३ शुक्रवार
शके १६८२, हा ग्वालदास कृपाराम.
श्रियासह चिरंजीव राजश्री गोविंद दीक्षित पाटणकर यांप्रती श्रीवाराणशीहून बालकृष्ण दीक्षित पाटणकर आशीर्वाद उपरि येथील क्षेम ता माघ वद्य ८ बुधवार जाणून स्वकीय लेखन करीत जाणें. विशेष. इकडील वर्तमान तरी आह्मीं समस्त सुखरूप असो. विशेष. श्रीमंत राजश्री भाऊ सरदार व फौजेसहवर्तमान पाणिपतावरी होते. अबदालीची फौजहि आसपास जवळ ती चौ कोशांचे अंतरें होती. त्यासी, पौष शुध्द ८ स युध्द उभयतांमध्यें भारी झालें. प्रात:काळपासून संध्याकाळपर्यंत युध्द झालें. उभयपक्षीं लोक बहुत पडिले. शेवट श्रीमंतांचा मोड झाला. तमाम सैन्य जें राहिलें तें पळालें. बुणगे लुटलें. ऐशी खबर लखनऊस आली. लखनऊस खुशाली झाली. लखनऊचें लिहिलें येथील अधिकारी यासी आलें कीं बरगी सर्व मारिले गेले, कांहीं पळाले. ऐसी खबर आदितवारीं पंचमीस सहा घटिका रात्रीस कळली. त्या उपरांतिक सोमवारीचे पहाटेचे सहा घटका रात्रीस आह्मांस खबर मुख्यानें दिली कीं, रात्रीची खबर खरी आहे, तुह्मीं सावध राहणें. तेच समयीं आह्मीं दोघी बायका घेऊन व रा बापूजीपंत व भिऊबाई व केशव दि पाटणकर व त्याची स्त्री ऐशीं तेच वेळेस गंगापार होऊन रामनगरास गेलों. दिवस उगवल्या सोमवार. तेथें सोम मंगळ दोन दिवस होतों. तेथूनही पुढें आणखी स्थलीं जाणार आहों. जेथें राहूं तेथून पत्र लेहून पाठवूं. घरीं एक ह्मातारी व अंतोबा, दोघे ब्राह्मण मात्र रक्षण ठेविले आहेत. याप्रकारीचे वर्तमान जाहलें. हरिभक्त शिकस्त खाऊन पळाले. परंतु कोणाची काय गत झाली ? पळाले कोण ? पडले कोण ? हे कांहीं खबर नाहीं. मोड होऊन पळाले ही खबर सत्य आहे. बरगे पळाले हें सत्य. ऐसें दुसरेंही वर्तमान. कालीं मंगळवारीं काशीकर ब्राह्मण लष्करांत होते ते सर्व बंद धरून पठाणानें नेला होता त्यास नवाबानें सोडविले. त्यापैकीं बाळंभट साने व वैष्णव एक ऐसे दोघे रा नरशिंगराव हरकारे याचे बिराडीं दोघे आले. त्यांनींही पत्र ऐसेंच लिहिलें होतें. तेव्हां हें वर्तमान खरेंसें झालें. परंतु युध्दांत कोण पडिले? य राहिले कोण ? हें कांहीं वर्तमान नाहीं. जहालें वर्तमान तुह्मांस कळलें पाहिजे यास्तव लिहिलें असे. तुह्मांसही परभारें वर्तमान कळेल. बहुत काय लिहिणें हे आशीर्वाद. याउपरि हुंडी न करणें. घरीं कोणीं नाहींत. हुंडी माघारी येईल ऐसा साफ जबाब सांगणें.