[५११] श्री. २४ जानेवारी १७६१.
पो फाल्गुन शुध्द १
शके १६८२.
चिरंजीव राजमान्य राजश्री गोविंद दीक्षित पाटणकर यांप्रती श्रीवाराणशीहून बाळकृष्ण दीक्षित पाटणकर आशीर्वाद येथील क्षेम ता माघ वद्य ५ जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष. सांप्रत तुह्मांकडील पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी येणारा मनुष्यासमागमें आपलें वर्तमान लिहीत जाणें. विशेष. इकडील वर्तमान तरी आह्मीं समस्त सुखरूप असों. राजकीय वर्तमान तरी श्रीमंत राजश्री भाऊ व सरदार व फौजेसहवर्तमान पाणिपतावर आहेत. अबदाली व रोहिला व नवाब सुज्यावतदौले ऐसे श्रीमंताच्या लष्करासमीपच आहेत. दो चौ कोशांच्या अंतरेंच आहेत. परस्परें लढाई रोजीचे रोज होतच आहे. मातबर जुंझें दोन चार जाहालीं. हरिभक्तांकडील लोक थोडकेसे पडले. परंतु अविंधाकडील मनुष्य बहुत पडिलें. दोन्हीं दळें कायम आहेत. लढाई संपली आहे. आणखी कितीक दिवस पुरवेल हें कांहीं कळत नाहीं. मुलूख सत्यानाशास मिळाला. दोन्ही फौजा भारी बैसल्या आहेत. इतक्यांस अन्न, पाणी, दाणा, वैरण मिळाली पाहिजे. परस्परें नाश होत आहे. ईश्वर काळरूपी जाहाला आहे. परिणाम काय होईल हें कळेना. अविंध महा खोटा आहे. श्रीविश्वेश्वर लज्जा रक्षील तरी रक्षील ऐसें आहे. सर्व जन भयाभीत आहे. भगवंतास सर्व जनांची चिंता असेलच. बरें ! पुढें जें होईल तें लेहून पाठवूं. तुह्मांकडे वर्तमान परभारें येतच असेल कळलें पाहिजे. यंदा इकडे अन्न स्वस्त आहे. धारणपूर्ववत्प्रमाणेंच आहे. कळलें पाहिजे. तुह्मी आपणाकडील वर्तमान वरीचेवरी लिहित जावें, व दक्षणेकडीलही वर्तमान लिहिलें पाहिजे. विशेष. राजश्री गोपाळराव गणेश बर्वे यांजला श्रीमंतांनीं आज्ञा केली कीं आपली फौज घेऊन, गंगापार जाऊन, नवाबाच्या मुलखांत धामधूम करणें. ऐशी ताकीद निकडीची आली. तेव्हां आपली फौज घेऊन, गंगापार जाऊन, दोन गांव एक फुलपुरा व दुसरा नवाबगंज ऐशीं दोनीं गांवें जाळून पोळून लुटून पस्त केलीं. इतकियांत नवाबाची फौज होती ते आली. त्याशीं याशीं गांठ पडली. गोपाळराव याजला जमीदार बळभद्र वगैरे सामील होते. तेव्हां युध्द जाहालें तेव्हां बळभद्र पळोन गेला. रा गोपाळराव आपले फौजेसमेत पळाले ते चारी लोक चहूंकडे जाहाले. ज्यास जिकडे वाट मिळाली तिकडे पळाला. खासा गोपाळराव पाचा साता स्वारांनशीं पळोन विंध्यवासनीवरून आपले स्थळास-कुरहाजाहानाबादेस- पावले. फौजही मागोमाग सर्व आली. कांहीं धक्का न लागतां सुखरूप आपले स्थळास गेले. कळलें पाहिजे. व रा गोविंद बल्लाळ बुंधेले यांजलाही याचप्रमाणें बोलावून नेऊन आज्ञा केली. तेहि अंतर्वेदींत दिल्लीसमीप उतरून, पांच सात गांव लुटून, जाळून पोळून टाकून, एके दिवशीं जो गांव लुटला त्याच स्थळावरी मोकाम जाहाला. पोटापाण्याचे तजविजीस लागले. तों इतकियांत अबदालीचे फौजेनें गाठ घातली. एकाएकीं येऊन पडले. तेव्हां पंताचा पुत्र रा बळवंतराव कांहीं स्वार घेऊन पळोन दिल्लीस गेला. गोविंदपंतही पळत होते तों गोळी लागोन घोडयावरून पडिले. अविंधाचे हस्तगत जाहाले. त्यांनी नाश केला. मोठा माणूस होता. गेला. मग पुत्र पळोन गेला होता त्याशी मागती आज्ञा केली कीं, बाप पडिला आणि तूं काय ह्मणून बसतोस ? तरी याच घडीस कुच करून जाणें. कांहीं मदतीस फौज देऊन रवाना केलें. ते तैसेच उतरले आहेत. तुह्मांसही वर्तमान कळलेंच असेल. बहुत काय लिहिणें लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.