प्रस्तावना
सर्व अनर्थ कान्होजीनें केला. हबशांचा हत्ती आणावयास सावनुरास जावें. किंवा न जावें ह्याची रवा ब्रह्मेंद्रानें जर आधींच कान्होजीला विचारली असती, तर हे तिहेरी सकट कशास ओढवते? परंतु होणाराला उपाय काय? शेवटीं ओढवलेल्या प्रसगाची परीक्षा करतां स्वामीस एक रामबाण उपाय सुचला स्वामीने आपल्या झोळींतून शिव्यांचें व शापांचें अमोघ अस्त्र काढिले “हत्ती सोडून देणे, नाहींतर तुझे कल्याण होणार नाही” असा शापसवलित मसुदा ब्रह्मेंद्रानें कान्होबाकडे पाठविला. झाली मजा येवढी बस झाली असा विचार करून व स्वामीच्या मसुद्याचा आदर करून, हत्ती बेदिकत सोडून देणें म्हणून सरखेलांनीं हुकूम सोडिला. हबशांचा हत्ती स्वामीने हबशांकडे पाठविला. जंजिरेकर हबशी याला सिद्दीसाताचें हे दुष्कृत्य कळतांच त्यानें त्याला नशेदपत्र पाठवून स्वामीची जिनगी स्वामीकडे पाठवून देण्यास सांगितले. यद्यपि स्वामीची चीजवस्त स्वामीला मिळाली, तत्रापि देवस्थानाचा जो उद्ध्वंस झाला होता तो कांही कोणत्याहि उपायानें नीट होण्यासारखा नव्हता. तशांत सिद्दीसातानें स्वामीवर अनेक बालांटे घेतलीं (पारसनीसकृत चरित्र, पृ २६ टीप). जंजिरेकर हबशांचें सिद्दीसात ऐकत नाही, स्वतः सिद्दीसात आपल्यावर तुफानें घेतो, व कान्होजी आंग्रे आपली मस्करी करतो, अशा त्रिविध अडचणीत स्वामी ह्या वेळीं सांपडला. सर्व लोकांनीं आपल्याला मान द्यावा, ही जी स्वामीची मनापासूनची इच्छा, तिचा ह्या वेळी सर्वस्वी भंग झाला. राजपुरीकरखानाने हुजूर मुलाखतीस आल्यास स्वामीस दोन गावे इनाम देण्याचे अभिवचन दिले. खानाच्या ह्या बोलण्यावर स्वामीचा विश्वास बसेना व खानाच्या भेटीस जाण्याचें त्याला अनुकूल पडेना. याकुतखान व सिद्दीसात ह्यांच्यावरील स्वामीचा विश्वास उडाल्यामुळें, त्याच्या प्रांतांतील परशराम ह्या गांवीं रहाणें स्वामीस शहाणपणाचें वाटेना. कान्होजीसारख्या थट्टेखोर व पाताळयंत्री माणसावर तर स्वामीचा विश्वास बिलकूल बसेना. तेव्हा यवनांसारख्या बोलून चालून दुष्ट माणसांच्या कान्होजींसारख्या आतल्या गाठीच्या मतलबी मराठ्याच्या सहवासात आपल्यासारख्या सीध्या व साध्या माणसाचा बोज राहणार नाहीं, अशी पक्की खात्री होऊन स्वामींनें कोंकणत्याग करून वरघांटीं जाण्याचा विचार केला. हा विचार कान्होजीस कळतांच, स्वामीस भिवविण्याची त्याने एक नवीनच शक्कल काढिली. कान्होजीनें स्वामीस वरघांटी न जाण्याची शपथ घातली (खंड ३, लेखांक१८०). शाप, शिव्या, शपथा, मंत्र, तंत्र, भुते, खेते, ह्याचा प्रभाव स्वामीच्या मनावर अतिशय असल्यामुळे, वरघाटीं जाण्याचा विचार स्वामीस काही दिवस तहकूब ठेवावा लागला. परंतु आपल्याला कोंकणात ठेवून घेण्यांत कान्होजीचा काहीतरी अंतस्थ मतलब असावा, अशी स्वामीस भीति पडली. दिवसेंदिवस ह्या भीतीचा पगडा अनिवार होऊन “गोठण्याहून स्वार होऊन स्वामी सावंतवाडी व गोवे ह्या प्रांताकडे गेले (खड ३, लेखांक१७६)” वरघांटीं न जाण्याची कान्होजीची शपथ सुटली नसल्यामुळें, त्यानें कर्नाटकांत गुत्तीकडे जाण्याच बहाणा केला. कोणीकडून तरी कोंकणपट्टीच्या बाहेर होतां होईल तों लवकर पडण्याचा स्वामीचा मनोदय होता. कोंकणांतील दुष्टांचा व धूर्तांचा सहवास क्षणभरहि न व्हावा हा त्यांचा मुख्य विचार होता. तदनुरूप गोव्याहून तो कोल्हापुरास गेला, तो वाटेंतील दगदगीने त्याला ज्वराची व्यथा झाली, (खंड ३, लेखांक १७५) कर्नाटकांत जाण्याचा रोख सोडून देण्यास ही सबब समर्पक आहे, असें पाहून, त्यानें पालीवरून धावडशीचा रस्ता धरला शपथेला भीक न घालता स्वामी कांही तरी बहाणा करून वरघांटीं जाणार हे कळून चुकल्याबरोबर कान्होजीने आपण घातलेली आण मोकळी केली.