[५१०] श्री. ७ फेब्रूआरी १७६१.
पो फाल्गुन वद्य १३ शुक्रवार
शके १६८२, हा पीतांबरदास.
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री गोविंद दीक्षित पाटणकर यांसी श्रीहून बाळकृष्ण दीक्षित पाटणकर आशीर्वाद उपरि येथील क्षेम ता माघ शुध्द २ मंदवार जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष. श्रीमंतांची फौज व खासे व सरदार सर्व दिल्लीपासून पश्चमेस पांच मजलीवरी पाणिपतावरी होते. अबदालीही फौजेसहवर्तमान त्याच स्थळीं होता. त्यास उभयता फौजेमध्यें लढाई मातबर जहाली. हरिभक्तांचा पराजय होऊन तमाम फौज पळाली. पौष शुध्द ८ स युध्द जाहालें. हें वर्तमान येथें आलें तेच क्षणी या शहरांत गडबड जहाली. आह्मीं माघ वद्य ६ स येथून कुटुंब घेऊन, पारीं दहा बारा कोसांवरी एकेकडे जाऊन राहिलों आहों. येथील ग्रामस्तांची क्रूर दृष्टि पाहून गेलों. पुढें दुसरें वर्तमान काय येतें त्याची मार्गदप्रतीक्षा करितों. जरी शुभिता पडिला तरी बरें ! नाहीं तरी येथूनही निघणें पडेल ! श्रीमंत पळाल्याउपरि आजीता कांहीं वर्तमान कळत नाहीं. त्यास, सांप्रत आजीचें वर्तमान आहे कीं गनीम सर्व एकत्र होऊन मथुरेवरी जमा जाहाले आहेत. ऐशी वार्ता आहे. परंतु ठीक वर्तमान नाहीं. हा काळ बहुत कठीण दिसतो. परिणाम काय होईल तो पहावा. या रीतीचें वर्तमान आहे. तुह्मांसही परभारा कळलेंच असेल. हे आशीर्वाद.