[५०९] श्री. १८ जानेवारी १७६१.
पो माघ वद्य १३
शके १६८२
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री गोविंद दीक्षित व रामचंद्र दीक्षित पाटणकर यांप्रती श्रीवाराणशीहून बाळकृष्ण दीक्षित पाटणकर आशीर्वाद उपरि येथील क्षेम ता पौष शुध्द १३ रविवार जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष. पश्चिमेकडील वर्तमान तरी श्रीमंत राजश्री भाऊ फौजेसहवर्तमान दिल्लीपलीकडे पाणिपतावरी आहेत. अबदालीशीं व श्रीमंतांशीं चहू कोशांचा अंतराय आहे. तीन युध्दें मातबर जाहालीं. दोन्ही फौजा कायम आहेत. पठाणाकडील थोडेंबहुत माणूस मारिलें गेलें. पठाण आपलें स्थळ सोडून चार कोश मागें सरला. कांहींशी शिकस्त पठाणानें खाल्ली आहे. अबदालीचा कमजोर आहे. पुढें होतां होईल तें पहावें. मुलुखांत धामधूम बहुत आहे. काळ कांहीं बरा नाहीं. ईश्वर लज्जा राखील ते खरी. कळलें पाहिजे. या वर्षी पीकपाणी बरें आहे. रबी चांगलीच आहे. बहुत काय लिहिणें लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.