[५०८] श्री. ८ डिसेंबर १७६०.
पै॥ पौष शुध्द १० शके १६८२
विक्रमनामसंवत्सरे.
श्रियासह चिरंजीव राजश्री गोविंद दीक्षित व रामचंद्र दीक्षित पाटणकर यांप्रती श्रीवाराणशीहून बालकृष्ण दीक्षित पाटणकर आशीर्वाद उपरि क्षेम ता मार्गेश्वर शुध्द १ जाणून स्वकीय लेखन करणें विशेष. तुह्मीं पूर्वीं पत्र तीर्थरूपांच्या वर्तमानाचें पाठविलें त्यापासून आजीतागायत पत्र पाठवीत नाहीं. यावरून अपूर्व आहे ! तरी आठ-पंधरा दिवसांचे अंतरें आपणाकडील वर्तमान तपशिलें लिहीत जावें. इकडील वर्तमान तरी : कालीं मार्गेश्वर वद्य चतुर्दशीचें पत्र पाठविलें आहे त्यावरून तपशीलवार वर्तमान कळूं येईल. सांप्रत श्रीमंत राजेश्री भाऊ व तथा राजश्री विश्वासराव फौजेसहवर्तमान इंद्रप्रस्थावरी आहेत. अबदाली व रोहिले व सुज्यावतदौले ऐसे एकत्र यमुनेचे दक्षणतीरीं आहेत. मातबर युध्द जाहालें. झटापटी होत आहेत. होईल तें वर्तमान लेहून पाठवून देऊं. तुह्मीं आपणाकडील वर्तमान वरीचेवरी लिहीत जावें. तिकडील संसाराचें ओझें तुह्मावरी पडिलें आहे. बहुत सावधपणें असावें. हे आशीर्वाद.