[५०७] श्री. ७ डिसेंबर १७६०.
पौष वद्य ३ शुक्रवार
शके १६८२.
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री गोविंद दीक्षित पाटणकर आशीर्वाद उपरी येथील क्षेम ता मार्गेश्वर कृष्ण चतुर्दशी जाणून स्वकीय लेखन करणें. विशेष. इकडील वर्तमान तरी दिल्लीस श्रीमंत राजश्री भाऊ व तथा रा विश्वासराव फौजेसहवर्तमान चार महिने प्रजन्यकाळ दिल्लीस होते. दसरा जालियावरी तेथून कूच करून पश्चमेस कुंजपुरा ठाणें होतें तेथें अबदालीचे लोक तिघे सरदार व स्वार चार हजार व प्यादे पांच सा हजार होते ते सर्व मारून फौज तेथील बुडविली. सरदार दोघे मारिले. व (एक) धरिला आहे. कांहीं खर्चासहि थोडें बहुत मिळालें. तेथें होते हें वर्तमान तुह्मासहि कळलेंच असेल. सांप्रत अबदाली यमुनेच्या उत्तरतीरी होता तो तेथून दक्षणातीरास आपण व रोहिला व सुजावतदौला ऐसे फौजेसहवर्तमान आले. हे वर्तमान श्रीमंतांस कळतांच तेचक्षणी कुंजपुरीहून स्वार होऊन अबदालीसमीप दो कोशांचे अंतरें येऊन राहिले. रोज त्यांशीं यांशीं झटापटी होती. शत्रू दमला आहे. हरिभक्तांच्या लष्करांत चवदा पंधरा शेर अन्न आहे. उभयता फौजा आपल्याल्या जागा कायम आहेत. परंतु मोगल अंतरीं भयाभीत आहे. अवघी फौज गोळा होऊन बैसला आहे. दाणा, पाणी, रसद बंद आहे. पुढें जे होईल तें लेहून पाठवूं. तिकडील श्रीमंताकडील वर्तमान वरचेवर लिहीत जाणें. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.