[५०३] श्री. ६ फेब्रुवारी १७६०.
पो माघ वद्य ६ गुरुवार
प्रात:काळ (शके १६८१)
सहस्रायु चिरंजीव विजयीभव रा गोविंद दीक्षित यांप्रती वासुदेव दीक्षित आशीर्वाद उपरि येथील कुशल ता माघ वद्य ५ जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. भौमवारीं दोनप्रहरा रात्रीं सांडणीस्वार दोघे श्रीमंत भाऊच्या लष्करांतून आले. त्यामध्यें वर्तमान आलें कीं रविवारीं मोंगलाशीं लढाई जाली. पिछाडीस तोंड लावलें. चार हजार फौज मोंगलाची लुटून घेतली. सूर्याराव मोगलाकडील कामास आला व हत्ती दहा बारा मोंगलाचे घेतले. एक मोगल जखमी, एक धरला आला आहे. चार हजार फौज मोगलाची बुडाली. आतां आणीक वर्तमान तपशीलवार येईल तें लिहून पाठवूं व यांनीं आराबा पिऊन गेले. श्रीमंत राजश्री दादाचे चिलखतावर तीर लागला; थोडासा. व विश्वासरावांनींही तिरंदाजी बहुत उत्तम केली. त्रिवर्ग हत्तीवर स्वार होते. पत्र वाचून सत्वर साताऱ्यास पाठवावें व तोफांचे बैल धरून यांनीं सोडून आणिले व निजामअल्लीखाच्या जवळ जाऊन पोहोंचले. त्याची यांची नजरानजर जाली. महातांनीं ह्मटलें कीं, आज्ञा कराल तर हत्ती नेऊन निजामअल्लीच्या हत्तीशीं भिडवितों. परंतु यांनींच क्षमा केली. युध्द तलवार व तीराचें जालें. तोफखाना कांहीं सुटला नाहीं. मातबर युध्द तलवारेचेंच झालें. युध्द मोठें जाले. यांचा जय बहुत प्रकारें जाला, तो सविस्तर लिहूं. बहुत काय लिहिणें, हे आशीर्वाद.*