[५०१] श्री. १ सप्टेंबर १७५९.
पो भाद्रपद वद्य ११
शके १६८१.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. श्रीकाशींमध्यें ब्राह्मणांचीं वर्षासनें आहेत तीं पावलीं नाहींत ह्मणोन बोभाट आला आहे. ऐशास, वर्षासनाचा ऐवज राजश्री गोविंद बल्लाळ यांजकडून पावला नाहीं ह्मणोन न पावलीं, किंवा त्यांकडून ऐवज पावोन तुह्मांकडोन न पावलीं, कीं अंबष्टांचा व वरकड ब्राह्मणांचा कजिया आहे यामुळें न पावलीं, हें सविस्तर कळावें लागतें. तरी लेहून पाठवावें. कदाचित् त्यांच्या कजियामुळें अडथळा केला असिला तरी धर्माचा विषय आहे त्यास अडथळा न करावा; वर्षासनें द्यावीं; ऐसें तुह्मीं वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळकृष्ण दीक्षित यांस लेहून पाठवून सत्वर उत्तर आणवावें. जाणिजे. छ ८ मोहरम. बहुत काय लिहिणें हे विनंति.