प्रस्तावना
असाहि स्वामीचा बाणा असे. हातीं घेतलेल्या कामांत आपल्याआड येण्याचें कोणास सामर्थ्य नाहीं, अशीहि अहंता स्वामीच्या ठायी वसत होती ह्या अहंतेच्या भरात दंगा होऊन स्वामी कर्नाटकांत दिग्विजय करण्यास व हबशांचा हत्ती घेऊन येण्यास निघाला. प्रांतोप्रांतींच्या सरकारांचीं दस्तकें घेतल्यास हत्ती सुरक्षित आणिता येईल असा सल्ला हबशांने दिला “परंतु तुमचे काय हत्ती असतील ते समागमें येतील, कोणाचे दस्तकाचें प्रयोजन नाही” असे स्वामीने हबशास फुशारकीचे उत्तर दिलें (चरित्र पृष्ठ १४) सामान्य कायदे सामान्य माणसास लागू. आपल्यासारख्या अलौकिक महापुरुषास कायद्याचें बिलकुल बंधन नाहीं, असे ध्वनित करण्याचा परमहंसांचा मनोदय होता. शत्रु असो, मित्र असो, यवन असो, मराठा असो, इंग्रज असो, किंवा पोर्तुगीज असो, वाटेल त्याची कामे, लढाई असो अगर नसो, करावयाची असा स्वामीचा बेगुमान स्वभाव असे. हबशाशी लढाई चालली असतांना आंग्र्यांची परवानगी विचारल्यावाचून, यवनाचा हत्ती सुरक्षित आणण्याचा उद्योग कितपत यशस्कर होईल ह्याची स्वामीस बिलकुल शंका नव्हती. १७२६ च्या हिवाळ्यात कर्नाटकात भिक्षा मागून १७२७ च्या प्रारंभी स्वामी हत्तीसमागमें कोंकणात उतरले व कांहीं लोकांबरोबर हबशांचा हत्ती हबशांकडे दस्तकावांचून मार्गस्थ करते झाले. माखजनच्या मेटापर्यंत हत्ती सुरक्षित आला. परंतु त्या मेटावर कान्होजी आंग्र्यांची चौकी होती तेथे हत्तीला मज्जाव झाला. विशाळगडच्या घाटावर हत्तीला येताना अटकाव झालाच होता. परंतु स्वामींच्या शिफारशीवरून केल्लेदारानें हत्ती पुढे जाऊ दिला. परंतु हत्ती हबशांचा आहे व त्याला दस्तक नाही असे कळल्याबरोबर, माखजनच्या मेटावरील आंग्र्यांच्या चौकीदारानीं हत्ती पकडून ठेविला. इतक्यात, जवळच हबशांचे चौकीदार होते त्यांस बातमी लागून ते हत्तीचा कबजा घेण्यास आले. आंग्र्यांच्या लोकांची व हबशांच्या लोकांची लढाई झाली. हबशांचें लोकांनीं माघार खाल्ली व हत्ती जयगडच्या किल्ल्यांतील आंग्र्यांच्या सैनिकांनीं आपल्याबरोबर नेला. ही बातमी सिद्दीसातास गोवळकोटास कळली स्वामीने आपला हत्ती आंग्र्यांच्या हाती काहीतरी निमित्त करून जाऊ दिला अशी भलतीच कल्पना करून घेऊन त्या बेहोष यवनाने एक चमत्कारिक प्रयोग केला. गेलेला माल वकिलाच्या मार्फत यादी पाठवून परत आणण्याचा, किंवा लढाई सपेतोंपर्यंत वाट पाहण्याचा, किंवा शत्रूला लढाई देऊन आपला हत्ती पकडण्याचा सीधा व सरळ मार्ग सोडून सिद्दीसाताने ब्रह्मेद्रस्वामींचे परशरामचें गांव व देवालय लुटून फस्त केलें आणि गांवांतील व देवळांतील बायकामाणसाची अब्रू घेतली. हा दुर्घट प्रसग १७२७ च्या फेब्रुवारींत शिवरात्रीस झाला (खड ३, लेखांक१) ह्या यवना प्रयोगाची दुर्वार्ता व हत्ती नेल्याची बातमी ब्रह्मेद्रांस बहुतेक एकदमच कळली. आंग्र्यांनें हत्ती नेला व सिद्दयानें गाव लुटले, हा दुहेरी घात स्वामींच्या हृदयाला दुभंग करता झाला. बिगरपरवाना हत्ती आणिला म्हणून आंग्रे रागावणार व तो गमावला म्हणून स्वामींच्या नांवानें सिद्दी हाका मारणार अशा विवंचनेत ब्रह्मेंद्र पडला. ह्या बाहेरच्या विवचनाहूनहि महत्तर अशी जी देवालयोद्ध्वंसनाची घरची विवंचना, तिनें तर स्वामीच्या काळजाचा भेदच केला. एका चुकीचा, एका घमेंडीचा, एक दस्तक न नंल्याचा हा सर्व खेळ झाला!