[४९९] श्री. १२ एप्रिल १७५९.
पो॥ चैत्र शुध्द ७ शुक्रवार
शके १६८१ प्रमाथीनाम.
तीर्थरूप राजश्री दादा स्वामी वडिलाचे सेवेसी :-
अपत्ये बालकृष्ण दीक्षित पाटणकर कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम ता चैत्र वद्य ६ सोमवार जाणून स्वकीय लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे. यानंतर वडिलीं हिशेब व पत्र पूर्वीं पाठविलें व वे॥ नारायणभट थत्ते यांजबराबरी पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळूं आलें. यात्रा यंदा हुताशनीकारणें प्रयागीहून श्रीस आली. यात्रेकरी यांसी येवर्षीं प्रयागवळ यानीं हकीमाशीं मिळून बहुत दु:ख दिलें. स्वारीस रुपये पन्नास घेतले. येथें गंगापुत्र काय घेतील हें पहावें. पुढें गया होणेंच आहे. याउपरि यात्रेकरियांत मातबर ह्मणायापैकीं रा पंतसचिव यांची स्त्री भवानीबाई व ग्वालेरीचे सुभेदार रा गोविंद शामराज यांचे भाऊ रा रामचंद्र शामराज व रा दादो मल्हार वाघोलीकर कुलकर्णी ऐसे आले आहेत. आणखी यात्रा पांच सात हजार आहे. कंगालहि बहुत आहे. दशाश्वमेधी छत्रांत पांचशें पात्र होत आहे. पहिले तीन शतें होत हालीं पांच शतें होतें. अद्याप गया जाहाली नाहीं. अडथळयामुळें फार करून येत नाहींत. आणखी कांहीं अधिक होतीलच. कळलें पाहिजे. दिल्लींत शिंदे व अंताजी माणकेश्वर यांची फौज आहे. ज्या स्थळीं भांडत होते तेथील मामलत जाहाली. हें सर्व वर्तमान परपस्परें तिकडे आलेंच असेल. येथील अधिकारी आपले स्थळीं आहे. सार्वभौमाचा पुत्र इंद्रप्रस्थीहून निघोन अयोध्येवाले याचे घरास गेला. तेथें सन्मान होऊन बिदा जाहाली, ते श्रीवरून पूर्वेस पट्टण्यासमीप गेला आहे. अद्याप स्तब्धच आहे. पुढें जो विचार होऊन येईल तदनरूप लेहून पाठवूं. कळलें पाहिजे. विशेष. रा गोपाळराव बर्वे यांचे बंधू रा कृष्णराव यांची स्त्री शांत जाहाली. त्यास काशींत वैजनाथ व्यास याची कन्या दिल्ही. काशींत धारण :- तांदूळ पंधरा शेरापासून पंचवीस शेर आहेत. तूप दर रु २॥। प्रमाणें आहे. गहूं नवे रु पासऱ्या व चणे सात पासऱ्या व जव सवा मण प्रमाणें आहे. तेल रु आठ शेर प्रा आहे. इंद्रप्रस्थाहून हरिभक्त व वजीर ऐसे येतील, हें आजच वर्तमान बोलतेत. कळावें. ह्या प्रांतीं धूमधाम होईल असें दिसतें. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.