[४९६] श्री. २२ सप्टेंबर १७५७.
सेवेसी विनंति. येथील वर्तमान तर : शिराळियाचा घाट चढलियावर श्रीमंतांचें पत्र नवाबास व मजला आलें कीं, नवाबाचा व आमचा स्नेह ऐसें असतां आह्मांस इतल्ला न देतां शहरास यावें उचित नाहीं, त्यांचे साहित्यास सावनुरावरी चुकलो नाहीं, पुढें स्नेह रक्षतील तर चुकणार नाहीं, नवाबानी शहरास न यावें, आह्मी लिहूं तेव्हां यावें, अशाहिमध्यें उतावळी करून येतील तर स्नेह राहणार नाहीं, परिच्छिन्न समजावें, तुह्मीहि याप्रमाणें परिच्छिन्न सांगणें. ह्मणून लिहिलें. त्यास, नवाबास पत्रें पावतीं करून श्रीमंतांचे आज्ञेप्रमाणें जाबसाल केला. त्यास नवाबानीं उत्तर केलें कीं :- आह्मांस या दिवसांत यावयाची दरकार नव्हती, परंतु श्रीमंतास पूर्वी सविस्तर लिहिलेच होतें; नवाब सलाबतजंग व बसालतजंग यांची पत्रें दररोज येत चाललीं; त्यावरून इभराइमखान गाडदी यास तीन हजार गाडदी, हजार स्वार, बारा तोफा, लाख रुपये दरमहाचे चाकर ठेवून व आपली फौज बरतर्फ केली होती ते सही करून, पांच हजार फौज, पांच हजार गाडदी, वगैरे वरकंदाज, तीस चाळीस तोफा घेऊन, चौ लाखाचे पेचांत येऊन, येथवर आलों; आतां पुढें न यावें तर लौकिक रहात नाहीं; आह्मी आलिया श्रीमंतांशी दुसरा अर्थ आपला नाहीं; ह्या गोष्टींत स्नेहाभिवृध्दी होईल. तें केलें जाईल. ऐसे कितेकप्रकारें बोलिले. तेणेप्रमाणें श्रीमंतांस लिहोन पाठविलें. व नवाबाचेंही उत्तर घेऊन पाठविलें. त्याउपर श्रीमंत राजश्री विश्वासरावजीची आज्ञापत्रें आलीं. त्यावरून कितेक विनंति केली कीं, श्रीमंतांची खिलाफ मर्जी करून नवाब खमखा शहरास जातील तर गोष्ट दुराग्रहांत पडेल. त्यावरून विचारांत पडले आहेत. नवाब सलाबतजंग यांची तो पत्रें येतच आहेत. त्यास, शनै: शनै: जाफराबादपावेतों जाणार. तेथें जो विचार करणें तो करतील. ठहराव जालियावर सेवेसी लिहिले जाईल. हालीं शहरीहून पत्रें नवाबाकडे, श्रीमंतांचा नवाब सलाबतजंग यांचा दारमदार ठहरला, शहानवाजखानास दौलताबाद अंतूर दोनहि किल्ले व पांच लाखांची जहागीर दिल्ही, श्रीमंतांही जागीर वीस लाखांची दिल्ही, कज्जा वारला, ह्मणून आली आहेत. याउपर पहावें, काय विचार करतील. बहुत काय लिहिणें. हे विनंति.