[४९५] श्री. २२ सप्टेंबर १७५७.
पौ अधिक आश्विन शुध्द ११ शनवार,
शके १६७९, दोन प्रहर दिवस.
वेदशास्त्रसंपन्न श्रीमंत राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी शामजी गोविंद सा नमस्कार विनंति येथील कुशल ता छ ९ मोहरम मु उत्तरापेठ पा अंबडापूर दर लष्कर नवाब निजामुद्दौला बहादूर स्वामीचे आशीर्वादे यथास्थित जाणून स्वकीय लेखनाज्ञा करीत असिलें पाहिजे. यानंतर, कृपा करून पत्र आश्विन शुध्द ५ रविवारचें पाठविलें तें काली मुक्काम मजकुरी पावलें. सविस्तर कळों आलें. नवाब शहरास येतात. त्यास नवाबाची प्रकृत उग्र. महाराष्ट्राकडील स्थळांस उपद्रव मागाहून करीत आले आहेत ह्मणून ऐकतों. येथें आलियावर मुक्काम सातारियावर जाला, तर गांव लोकांस शिवारास उपसर्ग लागेल. तर याचा उपाय आजीपासून करणें. इदग्याकडेहि उतरावयास स्थळ आहे ह्मणून लिहिले. ऐशियास, नवाबाची प्रकृत ह्मणावी तर केवळ उग्र नाहीं, समंजस आहे. मागाहून येथवर आले. त्यास महाराष्ट्राचेंच स्थळ जाणून उपसर्ग देत आले ऐसें नाहीं. जेथें काही दोष असतो तेथेंच उपद्रव, यावनी सैन्य पत्रधारी आदिकरून अनिवार आहे त्यामुळें, सहजच होतो; परंतु हा विचार येथवरच जाला. याउपर येथून पुढें बंदोबस्तानेंच येतील. शहरास आलियावर सातारियास उपसर्ग, स्वामीचा सेवक याचे समागमें निरंतर असतां, कसा लागेल ? येविशीं सूचनाहि काय दरकार ? शहरानजीक आलियावर उतरावयाचा निश्चय दरसुलाकडे अथवा इदग्याकडे करून घेऊं. चिंता न करावी. श्रीमंतांशी यांशी विरुध्दाचा विचार नाहीं. सलाबतजंग याशी व श्रीमंतांशी दारमदारहि, राजाजी श्रीमंतांकडून आले होते त्यांणी केला, ह्मणून येथें वर्तमान नवाबास आलें. त्यावरून बहुत संतोषी जाले. कदाचित् जाला नसता तरी याचे चित्तांत आपले विद्यमानें सलूखच करावयाचा आहे. हरप्रकारें श्रीमंतांची मर्जी रक्षावी हेंच याचें मानस दिसतें. बहुत काय लिहिणें हे विनंति.