प्रस्तावना
६, १७२६ च्या एप्रिलांत शामळानें निजामुन्मुलुखाच्या चिथावणीवरून पालगडाखालीं येऊन दगा केला. (शाहूमहाराजांची रोजनिशी पृ. ७) निजामुन्मुलुखाचें व मराठ्यांचें ह्यावेळीं युद्ध सुरू झाल्यामुळे निजामाच्या हुकुमाबरहुकूम शामळानें कोंकणात दंगा आरंभिला. निजामुन्मुलूख दिल्लीच्या पादशहाच्या विरुद्ध असल्याकारणाने व शामळ दिल्लीच्या पातशाहाचा नोकर असल्याकारणाने शामळाचे हें कृत्य अगदी गैरशिस्त होतें. दिल्लीच्या पातशहाचे हुकूम अमलांत आणण्याचा पत्कर बाळाजी विश्वनाथाने १७१९ त घेतल्यामुळे शामळाचा हा गैरशिस्त दगा हटविणे मराठ्यास प्राप्त झाले. नियमाप्रमाणे दगा हटविण्याचे काम शाहूने कान्होजी आंग्र्यास सांगितलें. आपापल्या प्रांतांतींल दंग्याधोप्याचें निवारण सरंजामीं सरदारांनीं होतां होईल तों आपले आपण करावें व शत्रू आपल्या शक्तीच्या अतोनात बाहेर आहे असें वाटल्यास हुजुरून सैन्याचीं मागणी करावी, असा शिरस्ता बाळाजी विश्वनाथाने घालून दिलेल्या सरंजामी पद्धतीच्या कलमांत नमूद होता. ह्या कलमान्वयें कान्होजीने हबशांचा दंगा मोडून काढला पाहिजे होता. परंतु आपल्या एकट्याच्यानें ते काम होणें शक्य नाही, हुजुरून सैन्य पाठवून द्यावे, असा मसुदा कान्होजीनें शाहूस लिहून पाठविला (रोजनिशी पृष्ठ ६१) दसरा झाल्यावर म्हणजे १७२६ च्या सप्टेंबर-आक्टोबरानंतर हुजुरून सैन्य पाठवून देऊ, तोपर्यंत स्वामीची स्थळे रक्षार्वी, असे उत्तर शाहूमहाराजांनी वरील मसुद्यास दिलें. स्वामींची स्थळे स्वामींनी रक्षावीं व आपल्यास ह्या मामल्यापासून मुक्त करावें, असेहि कान्होजीने शाहूस विशदर्थे म्हणजे स्पष्ट लिहून पाठविलें होतें. ज्याअर्थी स्थळे स्वामींची आहेत त्याअर्थी साहित्यही स्वामीसच करणें जरूर आहे, हा मुद्दा मान्य करून, कोंकण प्रांताचें सरक्षण काहीं काळपर्यंत करावें अशी शाहूनें कान्होजीस आग्रहपूर्वक विनंती केली व खसम व सीत दुसाला चोवीस हजार रुपये कान्होजीकडे येणे राहिलें होते ते ताबडतोब पाठवून देण्यास हुकूम सोडला. रुपये पाठविण्याचा हुकूम अमलांत आणण्याचें तहकूब करून कान्होजीनें कोंकण प्रांताचें सरक्षण करण्याची विनंती मात्र मान्य केली व हबशांशी लढण्याचा उपक्रम जारीनें हातीं घेतला. हबशांच्या व आंग्र्यांच्या जागोजाग चवक्या बसल्या व एकमेकांचीं गावे लुटण्याचा दोघांनी धूमधडाका चालविला. ह्या लढाईत हबशाला इंग्रज सामील असल्यामुळे इंग्रजांच्याही गलबतावर कान्होजीची दृष्टि होतीच. १७२६ तील ही लढाई ऐन रंगात कोठे येते न येते तो मध्यंतरी एक चमत्कारिक उपाख्यान घडून आले. १७२६ च्या सप्टंबरांत पावसाळा सपल्यानंतर ब्रह्मेंद्रस्वामी कर्नाटकात भिक्षार्थ स्वारीस निघाला. जाताना हबशाने सावनूरच्या नबाबाकडून आपला एक हत्ती प्रांतोप्रांतींच्या राजांच्या तडाक्यातून सभाळून घेऊन येण्यास स्वामीला विनंति केली. शिरस्त्याप्रमाणे ही विनंति ब्रह्मेंद्रानें मान्य केली. अशी दहा पांच फालतू कामे बगलेंत घालून बाहेर पडण्याची स्वामीला जन्माची खोडच होती. लग्नें, मुंजीं, जवाहीर, हत्ती, घोडे वगैरे बाबी ठरविण्यात, विकण्यात व विकत घेण्यांत आपला हातखंडा आहे, अशी स्वामींला घमेंड असे. आपल्याला कोणी फसवू शकणार नाही.