[४६२] श्री. १ सप्टेंबर १७५५.
पौ श्रावण वद्य १०
शके १६७७ युवा नामसंवत्सरे.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित गेलें पाहिजे. विशेष-सैद-लष्करखान यांचे मजकुराचीं पत्रें नवाब सलाबतजंग यांस व मुसा बूसी व शहानवाजखान यांस पाठविलीं होतीं त्यांचीं उत्तरें आलीं; त्यांच्या नकला पाठविल्या आहेत त्या पाहाव्या व खानास दाखवाव्या; उत्तर कोणे प्रकारें पाठवावें हें पुसून लिहून पाठवावें; व खानास पत्र पाठविलें आहे तें प्रविष्ट करावें; खानाचे साहित्याविषयीं मुसा बूसीस पत्रें पाठवावीं तेथें सर्व त्यांस अनुकूल आहेत; ह्मणून लिहिलें. ऐशियास, खानाविशीं मनापासून अंतस्तें सर्व प्रकारें साहित्यपत्रें व बोलणें होत आहे. परंतु सांप्रत तेथील पत्रें आलीं तीं पाठविलीं आहेत. पुढें ज्याप्रकारें तुह्मीं तजवीज योजून ल्याहाल त्याप्रकारें लिहून पाठवूं. चित्तशुध्द व सत्यभाषण तेथें याविशीं नाहींचसें दिसतें. परशरामपंतहि नीट नाहींत ह्मणून लिहिलें तेंहि यथार्थच आहे. परंतु सांप्रत परशराम महादेवहि हुजूर येत आहेत. सांप्रतचा फिरंगियांचा भाव खराखुरा कसा खानाविशीं आहे तें सर्व शोध करून लिहावें. हे विनंति.