[४६१] श्री. ३१ जुलै १७५५.
पौ श्रावण वद्य ८
शके १६७७
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव बावा दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक जानोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाला. गोविंद सुंदर देशपांडे कानगोद पा बाळापूर यांणीं जिवंत असतां आपले लेकीस चोळीलुगडयास सालीना तीनशें टके पा मजकूरचे लवाजिमापैकीं लेकीस लेहून दिल्हे. त्याचा पुत्र चालवीत नाहीं. त्याची ताकीद करून देशपांडे याचे लवाजिमापैकीं सदर्हू टके चालवावें. ह्मणोन लिहिलें. त्यावरून स्वामीच्या लिहिल्याप्रमाणें राजश्री कृष्णाजी गोविंद यांस ताकीद केली आहे. आपल्या लिहिल्याप्रमाणें बंदोबस्त करून देतील. रा छ २१ माहे शौवाल. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.