[४५९] श्रीशंकर.
श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षितबावा स्वामीचे सेवेसी.
चरणरज मेघ:शाम कृष्ण चरणावरी मस्तक ठेवून कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल पौष शुध्द १४ पावेतों मुक्काम पुणें सुखरूप असों. विशेष. बहुत दिवस जाले स्वामीकडून आशीर्वाद पत्र येऊन सांभाळ होत नाहीं. तरी ऐसें न करावें. निरंतरी आशीर्वाद पत्र पाठवून सेवकाचा परामृश करीत असावें. यानंतर इकडील वर्तमान तरी श्रीमंत राजश्री पंतप्रधान फौजसहवर्तमान कादवा संगमावरी आहेत. राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री जयाजी शिंदे ऐसे उभयतां श्रीमंत राजश्री विश्वासरावजीचे भेटीस पुणियासी आले आहेत. राजश्री महादाजी अंबाजी लष्करांतून सासवडास आले असत. सेवेसी कळावें ह्मणून विनंति लिहिली आहे. बहुत काय लिहिणें हे विज्ञापना.