[४५८] श्री. २३ जून १७५५.
पो आषाढ शुध्द १५
सोमवार शके १६७७.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रदान कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. विशेष. जीवनराव केशव यां समागमें खानांनीं सांगून पाठविलें आहे कीं, मुसा बुसी आदिकरून सर्वहि तेथील अमीर आमची आरजो करितात, कारभार करावा ह्मणून इच्छितात, एक आपली मर्जी असल्यास हें कार्य करूं, त्यास हैदरजंग व मुसा बुसी यांस पत्रें पाठवावीं कीं खानास वकील मुतलकी व कारभार सांगावा. ऐशास, जीवनराव परशराम महादेव यांचे निसबतीचे, शहानवाजखानांशीं केवळ ममतेंत यांशीं खान ह्या गोष्टी कशा बोलतील ? हा संदेह प्राप्त जाला. यास्तव आपणास लिहिलें असें. तर खानाशीं हा मजकूर तजविजीनें करून, या गोष्टीचा शोध बारकाईनें घ्यावा व लेहून पाठवावें. तेणेंप्रमाणें येथें करणें तें केलें जाईल. तहकीक सर्व अर्थ जरूर लिहून पाठवावे. बहुत काय लिहिणें हे विनंति.