[४५७] श्री. १२ जुलै १७५५.
पौ आषाढ शुध्द ११ शनवार
शके १६७७ युवा नाम.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक नमस्कार विनंति उपरि अजुरदाराबरोबर ज्येष्ठ वद्य १३ व चतुर्दशी ऐशीं दो दिवशींचीं दोन पत्रें पाठविलीं तीं आषाढ शुध्द तृतीयेस पावलीं. लिहिला मजकूर सविस्तर कळूं आला. खान मुरादखानाजवळ बोलिले कीं, फिरंगी आदिकरून बहुतकरून आह्मांस अनुकूल आहेत. आपली अनुज्ञा जाली ह्मणजे सर्व गोष्टी आमच्या पूर्ववत्प्रमाणें होऊन येतात. ऐसें बोलले. त्यास हा मजकूर मुरादखान जीवनरायाजवळ बोलले. त्याणीं विदित केला. व आणखी बोलले कीं, खानाजवळ आपली गुदरानी होत नाहीं, सेवेसीही रहावें या अन्वयें कितेक विनंति करणें आहे, त्यास भेटीस येतों. ह्मणोन त्यांस न यावें ऐसें ह्मणतां नये ह्मणून सुखरूप येणें ऐसें पत्र मुरादखानास पाठविलें होतें. परंतु फिरंगी आदिकरून कितेक खानाकडे ममतेंत आले कसे ? व नवाबाचें येणें अवरंगाबादेस होत नाहीं, तेव्हां खान एकाएकी उठोन नवाबाकडे जाणार नाहींत, असे कितेक प्रकारें आमचेहि चित्तास संशय वाटेल. ह्मणून ये गोष्टीचा शोध करून लिहिणें ह्मणून तुह्मांस लिहून पाठविलें; परंतु इतक्याहि गोष्टी प्रमाण, ऐसें खान बोलले, असें स्पष्ट लिहिलें नाहीं. परंतु इतका इतबार खानाचा मुरादखानाचे ठायीं नाहीं आणि ते प्रमाणिक नव्हेत. जीवनराव सर्व प्रकारें अप्रमाणिक. ये गोष्टीचा विचार सालस मातबर असतील त्याचे मारफातीनें व्हावा, सरकारचा मातबर इतबारी यावा आह्मीं त्यांचें व खानाचें बोलणें होऊन निश्चयांत गोष्ट आणूं, पुढेंमागें सालस मातबरानें मारफातीचें जाली ती बरी, असें कितेक विशदें लिहिलें. त्याजवरून हा मजकूर असेल असा भाव काढावा लागतो. तर मागती शोध करून यथास्थित खानास पुसोन लिहून पा. सर्वहि खानास अनुकूल होऊन खानाचे मनोभीष्ट सिध्दीस जात असेल तर आह्मांस संतोषच आहे. तुह्मी लिहिल्यावरून जीवनरायास सांगोन मुरादखानास लिहविलें कीं प्रस्तुत भेटीस न येणें, पुढें बोलावूं तेव्हां येणें ऐसें लिहिलें असें. शहरचे कामकाजास सरकारचा इतबारी लवकरच पाठविणार आहों. त्याजबरोबरही कितेक सांगोन पाठविणें तें पाठवूं. छ ३ सवाल हे विनंति.*