[४५४] श्री. ८ जून १७५५.
पौ आषाढ वद्य १ शके १६७७
युवनाम संवत्सरे
तीर्थस्वरूप राजश्री दादा स्वामी वडिलाचे सेवेसी :-
अपत्यें बाळकृष्ण दीक्षित पाटणकर कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम ता अधिक वद्य १४ जाणून स्वकीय लेखन करीत असिलें पाहिजे. यानंतर तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कांहीं कळत नाहीं. तरी सविस्तर वर्तमान लिहिलें पाहिजे. विशेष.हुंडी तुह्मांवरी केली एक येथें राखिलें. माधवराव कृष्ण वावडे देशमुख का भिंगार याचे मित्ति अधिक ज्येष्ठ वद्य षष्ठी शुक्रवारपासून दिवस एकाहत्तर उपरनामें धनीजोग रुपये रोकडे सुलाखी अवरंगशाहीची हुंडी तुह्मांवरी केली आहे. रु २९१० अक्षरीं एकोणतीसशें दहा रुपयांची केली आहे. तरी मुदतीस रुपये धणीजोग याची ठावठिकाणा चौकशी करून रुपये देणें. विशेष. इकडील वर्तमान तरी पातशाहा पाणिपतावरी गेले होते ते फत्ते करून हस्तनापुरास आले. जाटाची बोली लागली आहे. वीस लाख रु ते देत आहेत. हे अधिक मागतात. मामलत ठहरली नाहीं. परंतु ठहरेल. श्रीमंत रा रघुनाथपंत दादा व मल्हारबा ऐसे ग्वालेर प्रांतें आहेत. याचें वर्तमान पूर्वील पत्रीं लिहिलें आहे. त्यावरून श्रुत होईल. आयुध्येवाला आपले जागांच आहे. कारभार पूर्वीलप्रमाणेंच आहे. काशीचा अधिकारी राजा बळवंतसिंग याचे कन्येचें लग्न ज्येष्ठमासीं आहे. साहित्य होत आलें आहे आणि होतही आहे. मुलुकांतही महामारीचा उपद्रव मोठासा आहे. इकडे यंदां जरी आली आहे. शहरांत मनुष्य मात्र दुखण्यानें पडलें आहे. मरतातही बहुत. लोकांनीं दुर्गेला नवस केले आहेत. बागेंत जाऊन समाराधना करावी. पांचा सात दिवस निजतात आणि बरे होतात. दहाविसांत एखादा ज्याचा आयुर्दाव पुरला तो जातो. येरीतीचें वर्तमान आहे. धारण तरी तांदूळ चवदा शेरपासून अठरा शेरपावेतों आहेत. गहूं पांच सव्वापांच पासऱ्या, हरभरे सत्तावीस शेर, जव मणभर, तेल सा शेर, तूप साडेतीन शेर. याप्रों धारण आहे. कळलें पाहिजे. कडू तेल दोन शेर याप्रों आहे. व शिवरामपंताचा लेंक गेला. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. हे नमस्कार. चिरंजीव त्रिवर्गास आशीर्वाद. राजश्री भिकाजी महादेव यास आशीर्वाद.