[४५३] श्री.
करीना जिवाजी बिन् शिदोजी थोरात यांनीं लिहून दिला करीना ऐसाजे. शिवाजी पाटील याचे पुत्र पांच जण, वडील सुभानजी थोरात, त्याचे पाठीचे कृष्णाजी थोरात, त्याचे पाठीचे सूर्याजी थोरात, त्याचे पाठीचे फिरंगोजी थोरात, त्याचे पाठीचे शिदोजी थोरात. ऐसे ५ जण भाऊ एकत्र मायबापदेखील असतां अवघे प्रबुध्द जाहले. बापाचे वेळेस नाचार होता, व दोनी वतनांचाही थाक नव्हता. तेव्हां शिवाजी पाटील यांनीं लेकांस सांगितलें कीं, तुह्मी शहाणे झाला व कर्ते पुरुषही झाला, याजउपरि आपलीं दोनी गांवचीं वतनें साधावीं. या गोष्टीची ईर घातलियावर, अवघे भावांनीं विचार केला कीं, वडिलांचें वतन आपले दाईज मानीत नाहींत, याचा विचार करावा तरी या गोष्टीस आधार पाहिजे व आपलेजवळ पुरतेपणीही पाहिजे. ऐसा विचार केला आणि दवलत एकत्र असतां मिळविली. ७५ घोडे घरचे झाले, व बैल शंभर, ह्मैशी पन्नास पाऊणशे, गाई तीन चारशें, व दाणादुणा व वस्तभाव मिळविली. दोन्ही गांवचीं वतनेंही साधिलीं. वडील भाऊ सुभानजी थोरात याचे आज्ञेंतच भाऊ राहिले. ऐसा कित्येक दिवस कालक्षेप जाहला. तव पुढें कितेक दिवशीं घरांत कटकट निर्माण जाहली, त्यामुळें अवघें भाऊ वेगळे बाहीर गेले. परंतु कोणासही घोडे अगर इतर कांहीं दिलें नाहीं, सडेच आपल्या बायका घेऊन निघाले. आणि बाहीर जाऊन, आपले पराक्रमें चौघानींही पोट भरून राहून, वडील भावाचे मर्यादेसही अंतर केलें नाहीं. वांटणीचा मजकूर कृष्णाजी बावांनीं सुभानजी बावास पुशिला. तेव्हां त्यांनीं निष्ठुर जाब दिला. पुढें कटकट वाढावी तरी सर्वांनीं विचार केला कीं , आह्मीं अवघियांनीं वडील भावाशीं कटकट करावी तरी अजीच नायिकी मोडती, जोंवर आह्मांस बाहीर आपले पराक्रमें मिळतें तोंवर मिळवितच असों; निदानी बिछात आमची पांचांची आहेच. ऐसा विचार करून वडील भावाशीं कटकट न केली. पुढें कितेक दिवशीं सुभानजी बावांनीं मनसबा केला कीं, आष्टेचें ठाणें घ्यावें आणि जागा बांधून राहावें. तेव्हां चौघाही भावांस बोलावून हा विचार पुशिला. तेव्हा त्यांनी त्यांची आज्ञा मानून त्यांजबरोबर जाऊन अष्टेचें ठाणें घेतलें. त्यावर वडील भाऊ राहिले व चौघा भावांचीं मुलें माणसेंही तेथें राहिलीं. हरकोठें पोट भरून मागती गांवांत येऊन राहत होते. कज्जा खोकलेस सामील होते. वडिलांची बहुतशी मर्यादा रक्षूनच होते. ऐसे कितेक दिवस जाहले. नंतर आपले बाप शिदोजी थोरात हे मिरजेस चाकरीस गेले. तेथें घोडा मिळऊन शिलेदाराची चाकरी करीत असतां, झुंज गनीमाशीं जाहलें. तेव्हां झुंजांत तरवार चोखट बापास सांपडली. एक दोन घोडेही जाहले. मग भावाचे भेटीस आले. भेटी जाहलेवर एक दिवशीं तरवार पहावयासी आणविली. तेव्हां ती तरवार चखोट पाहिली, आणि ठेऊन घेतली.