[४५२] श्री. १४ मे १७५५.
पौ ज्येष्ठ शुध्द ८ मंगळवार
शके १६७७ युवानाम.
तीर्थस्वरूप राजश्री दादा वडिलांचे सेवेसी :-
अपत्येसमान बाळकृष्ण दीक्षित सा नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम जाणून स्वकीय कुशल लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे. यानंतर वडिलांनी हरिदास कृपाराम याचे कोठेयांत पत्र पाठविलें तें पावलें + + + + + राजश्री रघुनाथपंत व राजश्री मल्हारजी होळकर ग्वालेरीकडे आले आहेत. वडिलांस कळतच आहे. बहुधा तिकडे येतील. रा जयाजी शिंदे मारवाडांतच आहेत. सार्वभौम हस्तनापुराबाहेर निघाले आहेत. बेखर्च आहे. पुढें होईल तें पहावें. काशींत सांप्रती चैन आहे. + + + + + बहुत काय लिहिणें हे नमस्कार. मित्ती अधिक ज्येष्ठ शुध्द ३ बुधवार.