[४५०] श्री. ७ जानेवारी १७५५.
पौ माघ शुध्द ३ बुधवार
शके १६७६. भावनामसंवत्सरे
तीर्थस्वरूप राजश्री दादा वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें बाळकृष्ण दीक्षित पाटणकर कृतानेक सा॥ नमस्कार विनंति येथील क्षेम तागाईत पौष वद्य ११ भौमवार जाणून स्वकीय लेखन करीत असिलें पाहिजे. यानंतर तुह्मांकडील पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी सदैव आशीर्वादपत्र पाठवीत गेलें पाहिजे. विशेष. आपण येथून स्वार होऊन गेले त्यापासून आज तागाईत हिशेब तुमचा पाठविला आहे तो पहावा. हरिदास कृपाराम याची दुकानीची हुंडी चौत्तीस हजार व बनवारीदास हजारिया याचे दुकानीची रुपये सहा हजार येणेंप्रमाणें चाळिस हजार याच्या पाठविल्या, त्याचे रुपये पावले ह्मणून वर्तमान आलें. व हल्ली हुंडी पंधरा हजारांची मनसारामाचे हातींची शहरीं दुकान हरिश्चंद किसनचंद याचे दुकानीची पाठविली आहे. अवघे रुपये आठेचे. विशेष, मातुश्री राधाबाईंनीं दहा हजार रुपये आह्मांस येथें घराबद्दल देविले. त्यांस तों देवाज्ञा जाहली. आपण दुर्गाघांटास त्या ऐवजपैकीं खर्च करणें ह्मणून सांगितलें. त्यास रुपये ३१५० लागले. बाकी राहिले त्यास रो रघुनाथ बाजीराव यांनीं दिल्लीहून आह्मांवरी हुंडी दहा हजारांची केली आहे. आपणांस कळावें ह्मणून लिहिलें असे. विशेष. गतवर्षी शिवभट यांनी रु॥ दिल्हे. यंदां मकसुदाबादेंत रु॥ तों वसूल जाहले. हुंड्या अवरंगाबादेच्या तीन लक्ष पांचा हजारांच्या शिवभट यांच्या जोगच्या नागपुरास गेल्या. दुसऱ्या हुंडया कांहीं नागपुरास व कांहीं अवरंगाबादेस होतील. शिवभट तों नागपुरीं राहिले. शिवभटाचे तर्फेनें राजमाजीपंत व सिताराम न॥ मकसुदाबादेंत आहेत. शिवभट असता तरी ऐवज पावता होता. येथून आह्मीं पत्रें मकसुदाबादेस लिहिलीं आहेत. विशेष. शिवभट साठे यांजकडील ऐवज येथें येईल. त्यापैकीं येथें गवगव पडली तरी तुह्मावरी हुंड्या करून ऐवज द्यावा. येथून ऐवज मागेंपुढें पाठऊन देऊं. जरी सोय पडली तरी हुंडी करून तुह्मी दोन पत्रें दोघा काशीदांबरोबर पाठविलीं तीं पावलीं. लिहिला अर्थ कळूं आला. चाळिसा हजारांचा जाब पावलियाचा पा तो पावला. याजवरी तुमचा हिशेब काशीखातेपैकीं वडिलाकडे काय ? आणि शहरच्या खात्यांपैकीं आह्मांकडे काय? ऐसें इ॥ त॥ लेहून पाठविलें आहे. समजोन घ्यावें. ऐशीयास काशिताबो उत्तर पाठवावें. काशीदास रु॥ २ दोन द्यावे. आमचे नांवें ल्याहावे. जमा करून हुंड्या सकारून काशीदास सत्वर रवाना करावा. मनसारामाचे हातींची हुंडी आहे. बहुत काय लिहिणें. हे नमस्कार.