[४४९] श्री. १७५४.
शके १६७६.
वेदमूर्ति राज्यमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष. पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. खानांनीं भेटीस बोलाविलें होतें. नवाबापासून रुसकत होऊन आलों. नवाबाची मर्जी मिजाज विलक्षण जाली, याचें आमचें बनत नाहीं. आह्मांस दौलत नलगे, मक्केस जावें किंवा घरी बसून रहावें, या भावें आह्मीं नवाबास इस्ताफाही लेहून पाठविला ह्मणाले, उत्तर आलियावर सांगू बोलले. हें वर्तमान आपणांस कळवावें ह्मणाले ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास नवाब नासरजंग यांची मिजाज दाबआदाब भिन्न आहे. खानही पहिल्यापासून जाणतात. थोरले नवाबाची गोष्ट ह्मणावी तर त्यांनीं ऐकिलें देखिलें फार होतें. कोण्हा मनुष्याची कदर काय ? कोण मनुष्य कोण्या उपयोगाचे ? तें ते सर्व जाणत होते व कृपाही करून वाढवीत होते. त्यांची गोष्ट निराळी. हें तो गर्भांध आहेत. तथापि कालगतीवर दृष्टी देऊन खानांनीं आपले चित्तांतील आशय करीत असावें. येणेंकरून आपलें तेज राहून विचार स्वरूप अवकाशें होईल. केवळ एकाएकीं चढी घ्यावें, त्यांची मर्जी खप्पा करावी, त्यांणीं दूरदेशविचार चित्तांत आणावा, तर तेथील सार कळलाच आहे. यास्तव आमच्या विचारें तटीं न लावावें. वरकड खानासारिखें मनुष्य दिल्लीस गेले तरी जागा आहे. व हें तो घर त्यांचेंचअसें भाजीभाकर मिळेल तें देऊं. सारांश, तटीं न घ्यावें ह्मणून सांगावें. दौलत, ऐश्वर्य देणें ईश्वराचें आहे. केवल त्याच्या विलक्षण पदार्थावरी आपण संतोष पावावा असें नाहीं. प्रस्तुत तों ते तिकडे गुंतले आहेत. बादज-बदसात येतात किंवा चंदावर फुलचरीवाला यांणीं शौरवी केली तिकडेच गुंततात, कसें करितात तें कळेल. निरंतर वर्तमान लिहित जावें. आह्मांस सुचेल तें लिहीत जाऊं. खानास आपले जाणतों. ज्यांत त्यांची अब्रू तें करावयास अंतर करणार नाहींत. हें घर त्यांचे आहे. विस्तार काय लिहावा. सलोख्यानें नवाब याशीं राहणें. + + + + + +