त्यावरून त्यांनीं उत्तर दिलें कीं, ज्यांत तुमचें समाधान, टेंकडया आमच्याही काय कामाच्या. तेव्हां आठ किल्ले निकामी होते ते सोडिले. हर्ष व चौंडस, रामसेज व आणखी असे चार पांच किल्ले ठेविले; व दौलताबादसरकारचे पांच परगणे सोडिले. वस्त्रें देऊन निरोप दिला. इतक्यानें हे कृतकृत्य होऊन शहरास आले. स्नेह जाला. राघोबा व होळकर तेथून कुच करून हिंदुस्थानास गेले. पृथ्वीपतीकडील बोलावणें आलें कीं, कोटि रुपये देतों, सत्वर येणें. व वजिराकडीलही याचप्रकारें, कोट रुपये देतों, आह्मांकडे येणें. त्यास हे पृथ्वीपतीकडेच जाणार. पहावें. सांप्रत वदंता शहरांत उठली कीं, होळकरास दोन घाव लागले आहेत. कोण पाटलाची बायको लेकानें घरांत घातली ह्मणोन त्यानें मारिलें अशी बोली. व दुसरें, कोणी शिपाई रोजमुरा मागत होता त्यास शिव्या दिल्या, यास्तव त्याणें मारिलें. परंतु वांचला आहे. सत्यमिथ्य न कळे. वदंता शहरांत दाट, त्यावरून लिहिलें असे. यानंतर नसिरजंगाशीं व पेशव्यांशीं बाह्यात्कारें तों स्नेहच आहे, अंतस्थ कांहीं कळत नाहीं. प्रस्तुत बिघाडाची कांहीं शहरांत गडबड दिसत नाहीं. स्तिमितसें जालें आहे. आतां इतकें बोलतात कीं, जानोजी फौज ठेवितों. आपले देशांत जितके पेशव्यांकडे चाकर राहावयास शिपाई जात होते त्यां वर्जिले, अशी बोली आहे. पेशवे दसरा जालियावर बाहीर निघणार. जयाजी शिंदा पुण्यांतच होता. सांप्रत त्यास निरोप दिल्हा. वस्त्रें, कडीं देऊन सन्मानपुरस्पर करून आज्ञा दिली. तो चांभारगोंद्यांत आहे. कोणेकडे जाणार तथ्य नाहीं. एक बोली कीं, विश्वासरायास बराबर देऊन गुजराथेकडे पाठवावें. दुसरी बोली, हिंदुस्थानास दादाकडे रवाना करावें. दादाबराबर पंचविसहजार फौज नेविली. नालबंदी दिल्ही. जाईल. प्रस्तुत कांहीं बिघाडाचा प्रसंग नाहीं. यवनास भक्षायास नाहीं ! फौज नाहीं ! बिघाड कशाच्या बळें करावा ? असें तर दिसून येतें. यावर नकळे. प्रस्तुत शहरांत चोरांचा बहुतच उपद्रव जाला आहे.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57