[४३३] श्री. ३० सप्टंबर १७५३.
तीर्थरूप दादा वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें गोविंद दीक्षित व रामचंद्र दीक्षित कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम आश्विन शुध्द ४ रविवार पावेतों वडिलांचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे. विशेष. वडिलांचें आशीर्वादपत्र श्रावण वद्य ९ गुरुवारचें आलें तें आश्विन शुध्द ३ शनवारी पावलें. वर्तमान कळोन बहुत समाधान जालें. व पूर्वी दोन चार पत्रें पावली. या प्रांतीचें वर्तमान राजश्री पेशवे पुण्यांत आहेत. श्रावण मासी धर्म बहुत केला. सोळा लक्ष रुपये वाटिले.ऐशी सहस्त्र ब्राह्मण समुदाय मिळाला. पर्वतीत तीन दिवस दक्षिणा दिल्ही. आणखी एक अपूर्व गोष्टी जाली. एक गृहस्थ सातारेकडचा, त्यास पोटशूळाची व्यथा बहुत होती, ह्मणून कोल्हापुरास लक्ष्मीजवळ सेवेस गेला. तेथें स्वप्न जालें कीं, पुण्यास जाऊन पेशव्यांचें तीर्थ घेणें ह्मणजे तुझा रोग दूर होईल. त्यावरून तो गृहस्थ पुण्यास येऊन पूजासमयीं भेट घेतली. महालक्ष्मीचा चमत्कार सांगितला. ते गोष्टी त्यानी विनोदावर नेली. मग तो गृहस्थ आठ दिवस राहिला; तों पेशव्यांसच स्वप्न जालें कीं, त्या गृहस्थास तीर्थ देणें, अनमान न करणें. तेव्हा यानें गृहस्थास बोलावून पाठवून तीर्थ दिल्हें. तीर्थ घेतांच पोटशूळाची व्यथा दूर जाली. नारायणभट थत्ते त्या प्रसंगी तेथें होते त्यांनी सांगितलें. कळावें ह्मणोन लिहिलें असे. यानंतर मागील दिवसांत जनचर्चा दाट होती की, मोगल पेशव्यांशी बिघाड करितो. जानोजी निंबाळकर हणमंतराय निंबाळकर व रामचंद्र जाधवराव, या त्रिवर्गाकरवून फौज ठेविली आहे. ते फौज ठेवितात. दसरा जालियावर फौज घेऊन यावें. रघोजी भोसले याचा वकील व दमाजी गायकवाड व मल्हार होळकर व जयाजी शिंदे यांचे वकील आले. अंतस्थें सर्व फितव्यांत आहेत. बिघाड निश्चयें होतो. नानाप्रकारच्या गप्पा उठतात. हें वर्तमान वडिलांस एक दों पत्री लिहिलेंच आहे. कळलें असेल. थाळनेरांत राजश्री राघोबादादा व मल्हारजी होळकर होते. त्यांजकडे यवनानें आपला भला माणूस सैफुल्लाखान व मल्हारपंत किंभुवने, दोनशे स्वार, दोनचार हत्ती अशी थाटणी करून पाठविलें. बराबर परशरामपंत वकील व मनोहर बगाजी हेही पाठविले. लोकांत गप्प कीं, मल्हारजीस आणावयास गेले. त्यास हे तेथें जाऊन दादाची व मल्हारजीची भेट घेतली. ह्मणों लागले की, तुमचा आमचा स्नेह जाला. ते समयीं जो करार जाला त्याप्रमाणें तुह्मी चालावें. त्या कराराशिवाय दौलताबाद सरकारचे परगणे माणिकपुज, राजदेहर, वेताळवाडी, चाळिसगांव व आणखी एक असे पांच परगणें घांटाखाली खानदेशचे ह्मणोन जप्त ठेविले ते व किल्ले, नाशिक प्रांत वगैरे दहा बारा घेतले ते, असे सोडावे ह्मणजे तुमचा आमचा अकृत्रिम स्नेह.