[४३२] श्री. २३ सप्टेंबर १७५३.
तीर्थस्वरूप दादा वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें गोविंद दीक्षित व रामचंद्र दीक्षित कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम आश्विन शुध्द द्वितीया शुक्रवार पावेतों वडिलांचे आशीर्वादें करून समस्त सुखरूप असों. विशेष. वडिलांचें आशीर्वादपत्र श्रावण शुध्द १ मंगळवारचें भाद्रपद वद्य ८ गुरुवारीं पावलें. व पूर्वी आणखी ज्येष्ठमासची पत्रें दोन तीन पावली. वर्तमान कळोन बहुत समाधान जालें. या प्रांतीचें वर्तमान यंदा पर्जन्य बहुत जाला, येणेंकरून खरीपें थोडी बहुत आली, रब्बीच्या पेरण्या आतां चाली लागल्या आहेत. कायगांवी कालचा मुहूर्त पेरायाचा होता. रानांत सजगुरे दहा ठिकीं होती ती मोडिली. दुसवटा पेरतील. सातारियांत खरीप थोडें बहुत आहे, पुढें रब्बी पेरतात. पानास निरख उत्तम साडेचार पावणेपांच आजकाल आहे. पानें खुडत असतात. काम कारभार सुरळीत चालतो. वेदमूर्ति हरि दीक्षित व नारायण जोशी व भिकाजी नाईक येथून भाद्रपद शुध्द द्वितीयेस स्वार होऊन पुण्यास गेले आहेत. तेथें पावल्याचें पत्र आले होतें. भटी गोष्टीं जालियावर पत्र आलें नाहीं. आलियावर लिहून पाठवूं. राजकीय वर्तमान; मागील महिन्यांत फार गलबला होता कीं सला बिघडतो. जानोजी निंबाळकर व हणमंतराव निंबाळकर व चंद्रसेनाचा लेख असे एकमत जाले. पंचवीस हजार फौज जथोंन व मोगल असे मिळोन पेशव्याशी बिघाड करावा. त्यांजकडील होळकर व सिंदे वगैरे अगदी फितव्यांत आहेत. अवघ्यांचे वकील आले आहेत. होळकराकडे मोंगलाकडून सैफुल्लाखान व मल्हारपंत किंभुवने असे गेले आहेत. होळकर इकडे येणार असें वर्तमान होतें. तें एक दोन पत्री वडिलांस लिहिलेंच आहे, त्यांवरून विदित जालें असेल. सांप्रतकाळी विशेष कांहीं गलबल दिसत नाहीं. सैफुल्लाखान व मल्हारपंत गेले होते त्यांचा मतलब, किल्ले होळकरानें दहा बारा घेतले होते, ते व घाटाखालें चार पांच परगणे, माणिकपूज, राजदेहर व वेताळवाडी व चाळीसगांव, दौलताबाद, सरकारचे जप्तींत होते ते सोडवावें. त्यास होळकरानें आठ किल्ले निकामीं टेकडया सोडिल्या, व दौलताबाद सरकारचे पांच परगणे खानदेशांत ह्मणून दबाविले होते ते सोडिले. कागदपत्र देऊन वाटें लाविलें, आणि राजश्री राघोबादादा यांस बराबर घेऊन हिंदोस्थानास कूच करून गेले.