[४३०] श्री. ३ सप्टेंबर १७५३.
पौ आश्विन शुध्द १३ शके १६७५.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री गोविंद दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक हरी दीक्षित व नारायण जोशी सा नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम आश्विन शुध्द सप्तमी मुक्काम पुणें, जाणून सुखरूप असो विशेष. सरकारचें कामकाज जें होतें तें सर्व जाहालें. राजी रामाजी केशव यांजकडे जैनाबादेची मामलियेत दरोबस्त देखील निमकस्वाच्या प्रतापें जाहाली. रसदेचा भरणा करणें मात्र राहिला आहे. तोही स्वामीच्या प्रतापें होईल. राजश्री भिकाजी नाइकांनीं पत्र लिहिलें त्याजवरून निवेदन होईल. दिपवाळीपावेतों सेवेसि येऊं. विदित असावें. बहुत काय लिहिणें. कृपा असो देणें. हे नमस्कार.